नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील इतवारा आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या दोन घटना उघडकीस आल्या असून, अज्ञात चोरट्यांनी दोन घरांना लक्ष्य करत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण ३२ लाख ८८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लक्ष्मीनगरमध्ये २९ लाख ९६ हजार ५०० रुपयांची चोरी पहिली घटना इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देगलूर नाका परिसरातील लक्ष्मीनगर येथे घडली. फिर्यादी शेख इब्राहिम चुनुमियाँ (वय ४४, रा. लक्ष्मीनगर, देगलूर नाका, देगलूर) यांच्या घरी १९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११ ते २० ऑक्टोबर रोजी पहाटे २.३० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण २९ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी शेख इब्राहिम चुनुमियाँ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इतवारा पोलीस ठाण्यात गुरनं. ३५२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३१(४) आणि ३०५(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जावेद पठाण या प्रकरणाचा तपास करीत आहेत. भाग्यनगरमध्ये २ लाख ९१ हजार ९०० रुपयांचा ऐवज चोरीला दुसरी घटना भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेदांतनगर परिसरातील सिद्धेश्वर पार्क येथे घडली. फिर्यादी सुरेश बालाजी गट्टुलवार (वय ३५, रा. सिद्धेश्वर पार्क, वेदांतनगर, नांदेड) यांच्या घरी १७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १.३० वाजेपासून २० ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण २ लाख ९१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी सुरेश बालाजी गट्टुलवार यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुरनं. ६०८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३१(३)(४) आणि ३०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख या प्रकरणाचा तपास करीत आहेत. शहरातील दोन वेगवेगळ्या भागांत घडलेल्या या घरफोड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ऐवज चोरीला गेल्याने नागरिकांनी घरांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे. दोन्ही प्रकरणांतील अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. Kanthak Suryatal Post Views: 80 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation वाहेगुरूजींची कृपा म्हणून दुर्घटना टळली; आता महानगरपालिका जागी होणार की दुर्घटनेचीच वाट पाहणार?