पीडितेला ५ लाखांची मदत अन् नराधम बापाला मरेपर्यंत कारावास; हिंगोली न्यायालयाचा निकाल

हिंगोली (विशेष प्रतिनिधी) –  अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या जन्मदात्या वडिलांना जिल्हा न्यायाधीश-१ हिंगोली, श्रीमती एस. एन. माने-गाडेकर यांनी दोषी ठरवत नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत आजन्म सश्रम कारावास आणि १ लाख २ हजार रुपये दंडाची ऐतिहासिक शिक्षा ठोठावली आहे. तसेच पीडित मुलीस मनोधैर्य योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आदेश न्यायालयाने शासनाला दिले आहेत.

घटनेचा पार्श्वभूमी व सविस्तर तपशील

प्रकरणानुसार, १८ एप्रिल ते २० एप्रिल २०२३ दरम्यान आरोपी वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीला खाण्यासाठी आणलेल्या गुलाब जामुन, भेळ आणि कलाकंद मध्ये गुंगीचे औषध देऊन ती अर्धवट झोपेत असताना छेडछाड केली. त्यानंतर २२ एप्रिल २०२३ रोजी रात्री ११:०० वाजेच्या सुमारास मुलीचे दोन्ही हात ओढणीने बांधून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला व कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडितेने २९ एप्रिल २०२३ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे सेनगाव येथे कलम ३७६(२)(एफ), ३७६(३), ३२३, ५०६ भा.दं.वि. आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास व न्यायालयीन कामकाज

प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी दिलीपराव वरगे यांनी सखोलपणे करून विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील एन. एस. मुटकुळे यांनी एकूण १२ साक्षीदार तपासले. यामध्ये पीडित मुलीची साक्ष, तपास अधिकारी आणि इतर साक्षीदारांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. या कामात सहाय्यक सरकारी वकील एस. डी. कुटे, श्रीमती सविता एस. देशमुख (जाधव) आणि कोर्ट पैरवी पोलीस अंमलदार प्रमोद आश्रोबा मार्कड यांनी सहकार्य केले.

न्यायालयाने सुनावलेली शिक्षा (दिनांक: १७/१०/२०२६)

  • कलम ३७६(२)(एफ) भा.दं.वि.: नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत आजन्म सश्रम कारावास व ₹५०,०००/- दंड (दंड न भरल्यास १ वर्ष अतिरिक्त सश्रम कारावास).
  • कलम ३७६(३) भा.दं.वि.: नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत आजन्म सश्रम कारावास व ₹५०,०००/- दंड (दंड न भरल्यास १ वर्ष अतिरिक्त सश्रम कारावास).
  • कलम ३२३ भा.दं.वि.: ०६ महिने सश्रम कारावास व ₹१,०००/- दंड (दंड न भरल्यास १ महिना सश्रम कारावास).
  • कलम ५०६ भा.दं.वि.: ०१ वर्ष सश्रम कारावास व ₹१,०००/- दंड (दंड न भरल्यास १ महिना सश्रम कारावास).
  • पोक्सो कायदा (कलम ३, ४): भा.दं.वि. च्या कलमांतर्गत मुख्य शिक्षा दिल्यामुळे स्वतंत्र वेगळी शिक्षा नाही.
  • एकूण दंड रक्कम: ₹१,०२,०००/-
  • पीडितेला मदत: मनोधैर्य योजनेअंतर्गत ₹५,००,०००/- (पाच लाख रुपये) आर्थिक मदत देण्याचे आदेश.

न्यायालयाने सर्व शिक्षा एकत्र भोगण्याचा आदेश दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!