कॉंग्रेसमध्येच बसलेत भाजपचे स्लीपर सेल! राहुल गांधींची मेहनत मातीत घालणारे अंतस्थ गद्दार कोण? राहुल गांधींचा संघर्ष आणि पक्षांतर्गत गद्दारीचा खेळ भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या कथित लोकप्रियतेचे मुखवटे जेव्हा जेव्हा राहुल गांधी रस्त्यावर उतरून उघडे पाडतात, तेव्हा भाजपचा एक घिसापिटा रेकॉर्ड सुरू होतो. राहुल गांधी १०० निवडणुका हारले. पण प्रश्न हा आहे की राहुल गांधींना या निवडणुकांमध्ये खरोखर भाजप हरवते की काँग्रेसच्या आत बसलेले गद्दार? वस्तुस्थिती अशी आहे की देशातील ६० टक्के जनता आज राहुल गांधींच्या पाठीशी उभी आहे, परंतु काँग्रेसमध्येच असे स्लीपर सेल्स ठाण मांडून बसले आहेत जे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधींची सर्व मेहनत मातीत घालण्याचे काम करतात. भाजपला पराभूत करण्याची क्षमता आणि जनतेचा प्रचंड पाठिंबा असूनही, निवडणूक यंत्रणा आणि पक्षातील हेच अंतस्थ शत्रू राहुल गांधींचा पराभव घडवून आणतात. आगामी उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी हे स्लीपर सेल पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने सक्रिय झाले आहेत. उत्तराखंड: ८० वर्षांच्या हरीश रावत यांची यात्रा रोखणारी शैलजा आणि गद्दारांचा सत्कार! उत्तराखंडमध्ये काँग्रेस अनुकूल वातावरण निर्माण करत होती. वयाच्या ८० व्या वर्षी हरीश रावत तेथे जनसंवाद यात्रा काढून जनतेशी थेट संवाद साधत होते आणि या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत होता. परंतु, पक्षातील स्लीपर सेलच्या पोटात दुखी सुरू झाली आणि उत्तराखंडच्या प्रभारी कुमारी शैलजा यांनी ही यशस्वी यात्रा अचानक थांबवायला लावली. उत्तराखंड काँग्रेसमधील ही गद्दारी किती विकोपाला गेली आहे, हे हरीश रावत यांच्या उद्विग्न ट्विटवरून स्पष्ट होते. २०१६ मध्ये ज्या व्यक्तीने अफाट पैशांच्या जोरावर काँग्रेसचे सरकार पाडण्याचे काम केले, त्याला आज हरिद्वारमधील काही नवे हुडदंगी कांग्रेसी महिमामंडित करत आहेत आणि डोक्यावर घेऊन नाचवत आहेत. ज्यांनी २०१६ मध्ये सरकार पाडून कोट्यवधींची माया गोळा केली, ते आज काँग्रेसमध्ये हिरो ठरत आहेत; आणि ज्यांनी पक्ष वाचवण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावले, त्यांना आज व्हिलन ठरवले जात आहे. हा सरळसरळ पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर उपसण्याचा प्रकार आहे. मांडवली बादशाह आणि हरक सिंग रावत यांची पुनर्स्थापना उत्तराखंडमध्ये मांडवली बादशाह म्हणून ओळखले जाणारे उमेश आणि २०१६ मध्ये सरकार पाडणारे हरक सिंग रावत यांच्यासारख्या भाजपधार्जिण्या नेत्यांना काँग्रेसमध्ये रेड कार्पेट दिले जात आहे. हरक सिंग रावत यांच्यावर २००३ मधील सीबीआय चौकशी, २०१४ मधील विनयभंगाचा आरोप आणि २०१६ मधील गंभीर गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप राहिलेले आहेत. अशा डागाळलेल्या व्यक्तीला पक्षाने उत्तराखंडच्या निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद सोपवले आहे. दुसरीकडे, कुमारी शैलजा यांचा प्रशासकीय आणि संघटित ट्रॅक रेकॉर्ड अत्यंत उघडा पडला आहे. त्या छत्तीसगडच्या प्रभारी असताना काँग्रेसची सत्ता हातातून गेली. हरियाणा विधानसभा निवडणुकीत त्या कोपभवनात रुसून बसल्या आणि पक्षाचे नुकसान केले. त्यानंतर त्यांना उत्तराखंडात पाठवले गेले, जिथे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा ५ विरुद्ध ० असा दारुण पराभव झाला. तरीही अशा निष्प्रभ नेत्यांना पदावर कायम ठेवून संघटन चालवणाऱ्यांची नियत नक्की काय आहे, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. उत्तर प्रदेशात पुन्हा गद्दारीचा मार्ग मोकळा: २.३४% आणणाऱ्यांच्या हाती सूत्रे! उत्तर प्रदेशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अविनाश पांडे आणि अजय राय यांच्या जोडीने समाजवादी पक्षासोबत युती करून काँग्रेसला संजीवनी दिली होती. परंतु, पक्ष जिंकवणारे आणि रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे नेते काँग्रेसच्या अंतर्गत टोळीला सहन होत नाहीत. त्यामुळे उत्तर प्रदेशात अप्रतिम कामगिरी करणाऱ्या अविनाश पांडे यांना हटवून घरी बसवण्यात आले. त्यांच्या जागी उत्तर प्रदेशची कमान पुन्हा एकदा प्रियंका गांधी यांच्या मर्जीतील प्रमोद तिवारी यांची मुलगी अराध्या मिश्रा (मोना) आणि इम्रान मसूद यांच्या हाती सोपवण्यात आली. ही तीच टीम आहे ज्यांनी यापूर्वी उत्तर प्रदेशात पक्षाची व्होट बँक २.३४ टक्क्यांवर आणून ठेवली होती. ज्या अजय राय यांनी पक्षासाठी मार खाल्ला, त्यांना बाजूला सारून अशा पराभूत आणि मलाई खाणाऱ्या नेत्यांना पुढे केले जात आहे. अखिलेश यादवांशी युती तोडण्याचा भाजप पुरस्कृत कट? उत्तर प्रदेशात आगामी २०२७ च्या निवडणुकीसाठी अखिलेश यादव आणि काँग्रेसची युती मजबूत राहणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु काँग्रेसमधील प्रियंका गांधींच्या मर्जीतील काही तथाकथित नेते आणि इम्रान मसूदसारखे चेहरे ऐनवेळी जागा वाटपाचे पतंग उडवून युतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम करत आहेत. समाजवादी पक्षाशी युती तुटावी यासाठीच हे सर्व कारस्थान रचले जात आहे, जेणेकरून भाजपचा रस्ता निष्कंटक होईल. इम्रान मसूद हे स्वतः सपाच्या पाठिंब्याशिवाय स्वतःची जागा जिंकू शकत नाहीत, परंतु ते काँग्रेसच्या जिवावर उड्या मारत आहेत. २०१७ मध्ये पक्षाला ६-७% वरून २.३४% वर आणणारे हेच लोक आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात काँग्रेसचा पुरता बट्ट्याबोळ करण्यासाठी सरसावले आहेत. बंडखोरांना बक्षीस अन् निष्ठावंतांना बाहेरचा रस्ता काँग्रेस संघटनेचा एक विचित्र नियम बनला आहे.पक्षविरोधी कारवाया करा, बंडखोरी करा आणि पक्षात मोठे पद मिळवा! राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार पाडण्याचा आणि भाजपच्या मांडीवर जाऊन बसण्याचा प्रयत्न करणाऱ्या सचिन पायलट यांना शिक्षा देण्याऐवजी आता पंजाबचे प्रभारीपद सोपवण्यात आले आहे. ज्या सचिन पायलट यांनी राजस्थान बुडवण्याचा प्रयत्न केला, ते आता पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आणतील का, हा मोठा प्रश्न आहे. तेलंगणात विजय मिळवून देणाऱ्या ठाकरेंसारख्या नेत्यांना हटवून गोव्यात पाठवले जाते, जिथे ते जिंकले की पुन्हा ईशान्य भारतात हाकलले जाईल. म्हणजे जो नेता पक्षाला विजय मिळवून देतो, त्याला बाजूला करायचे आणि जो पक्ष बुडवतो, त्याला राज्यसभेत पाठवायचे किंवा मोठे राज्य सोपवायचे, हा वेणुगोपाल आणि त्यांच्या गँगचा धंदा बनला आहे. प्रियंका गांधींचा वलयकारी प्रभाव विरुद्ध संघटित अपयश प्रियंका गांधी या यात शंका नाही की एक उत्तम वक्त्या आणि स्टार प्रचारक आहेत. परंतु संघटना चालवण्यात त्या झिरो ठरल्या आहेत. आसाम, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि हरियाणा या सर्व राज्यांत प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखालील टीमने (संदीप सिंह आणि कंपनी) पक्षाची दाणादाण उडवली आहे. काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हे या सर्व स्लीपर सेल्सचे मुख्य सूत्रधार आणि सर्वात कमकुवत कडी ठरत आहेत. पक्षातील मांडवली करणारे, दलाल आणि भाजपचे एजंट वेणुगोपाल यांच्याच छत्रछायेखाली गब्बर होत आहेत. ११ व्या तासाची गद्दारी: बिहारपासून हरियाणापर्यंतचा जुना इतिहास काँग्रेसमध्ये ऐन निवडणुकीच्या ११ व्या तासाला प्रभारी आणि अध्यक्ष बदलण्याचा एक ठरवून केलेला गनिमी कावा चालतो. बिहार निवडणुकीत जेव्हा तेजस्वी यादव यांच्या बाजूने प्रचंड लाट होती, तेव्हा रणदीप सुरजेवाला आणि काँग्रेसच्या अंतर्गत हातांनी रातोरात ८ बी-फॉर्म बदलले आणि जिंकणाऱ्या जागा हरवून तेजस्वी यादव यांचे सरकार येण्यापासून रोखले. हाच खेळ आसाममध्ये खेळला गेला आणि हाच खेळ आता उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात खेळला जात आहे. निष्कर्ष: राहुल गांधींनी या गद्दारांची छाटणी केलीच पाहिजे! राहुल गांधी रोज रस्त्यावर उतरून रक्त-आटवून मेहनत करतात, मोदी सरकारच्या धोरणांवर प्रहार करतात, परंतु संध्याकाळी दिल्लीत बसलेले हे सोयीस्कर नेते आणि दलाल त्यांच्या मेहनतीवर शेण कालवण्याचे काम करतात. जर काँग्रेसला आणि विरोधी पक्षांना २०२७ आणि त्यानंतर टिकून राहायचे असेल, तर राहुल गांधींना सर्वात आधी पक्षातील या स्लीपर सेल्सला आणि भाजपच्या दलालांना ओळखून पक्षाबाहेर हाकलावे लागेल. हे विश्लेषण कोणाची सुपारी घेऊन केलेले नाही, तर निष्पक्ष पत्रकारिता म्हणून मांडलेला हा आरसा आहे. जर राहुल गांधींनी या गद्दारांवर तातडीने कारवाई केली नाही, तर काँग्रेसचा विनाश अटळ आहे! Kanthak Suryatal Post Views: 10 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation आधी मुख्य शत्रूला नमवा, मग आपापसात पाहा! – व्ही. पी. सिंहांचा १९८९ चा फॉर्म्युला राहुल गांधी राबवणार का?