क्यूआरटी पथक: पोलिसांचा देखावा की आपत्कालीन रक्षक? नांदेड पोलीस अधीक्षकांचा व्हीआयपी रुबाबावर चाप!

व्हीआयपी रुबाब बंद, क्यूआरटी जवानांना मोकळा श्वास!

नांदेड (प्रतिनिधी)  – २००८ मधील मुंबई अतिरेकी हल्ल्यानंतर महाराष्ट्र सरकारने अत्यंत आणीबाणीच्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी क्यूआरटी म्हणजेच जलद गतीसाद  प्रतिसाद पथकाची स्थापना केली. संपूर्ण महाराष्ट्रात १६ क्यूआरटी पथके असून नांदेड परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांसाठी केवळ एकच पथक तैनात आहे. फोर्स वनच्या देखरेखीत चालणाऱ्या या पथकात नांदेड मध्ये ८ अधिकारी व ४८ कर्मचारी असून, अतिरेकी हल्ला झाल्यास फोर्स वनची ताकद येईपर्यंत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याची मुख्य जबाबदारी यांच्यावर असते.

नियमानुसार मूळ कर्तव्ये आणि सराव: वस्तुतः कार्यपद्धतीनुसार क्यूआरटी पथकाने जिल्ह्यातील अतिसंवेदनशील व महत्त्वाच्या ठिकाणी नियमित रेकी करून परिसराचा व परिस्थितीचा अभ्यास करणे, तसेच वेगवेगळ्या ठिकाणी आपत्कालीन प्रसंगांना तोंड देण्यासाठी प्रत्यक्ष सराव करणे आवश्यक असते. याशिवाय नियमानुसार या पथकातील जवानांना दर महिन्याला गोळीबाराचा सराव करणे आणि दर महिन्याला व तीन महिन्यांनी पीपीईटी व डीपीईटी या शारीरिक चाचण्या पार पाडणे बंधनकारक आहे. कोणत्याही बाका प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी या पथकाला २४ तास अलर्ट राहावे लागते.

खोचक वास्तव: व्हीआयपींचा देखावा बनलेले विशेष पथक परंतु क्यूआरटीची स्थापना झाल्यापासून नांदेडमध्ये आलेल्या प्रत्येक पोलीस अधीक्षकाने या उच्चप्रशिक्षित पथकाचा वापर मूळ कर्तव्यांऐवजी आपल्या वैयक्तिक देखाव्यासाठी आणि रुबाबासाठीच अधिक केला. पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी कार्यालयात कामासाठी जावोत की गल्लीतील गणपती दर्शनाला, हे क्यूआरटी पथक त्यांच्या मागे-मागे गाड्यांचा ताफा घेऊन फिरताना दिसायचे. संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी अगोदरच हजर असतानाही, नांदेड जिल्ह्याला मिळालेल्या या विशेष सुविधेचा वापर अधिकाऱ्यांनी स्वतःचा रुबाब दाखवण्यासाठी केला.

प्रशंसनीय पाऊल: डॉ. नीलाभ रोहन यांचा देखाव्याला पूर्णविराम मात्र, २४ जून २०२६ रोजी नांदेडच्या पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ  रोहन  यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या देखाव्याला पूर्णविराम दिला. त्यांनी या विशेष पथकाला आपल्या मागे फिरवण्यास ठाम नकार दिला असून, त्या स्वतःसोबत केवळ एकच सुरक्षारक्षक ठेवतात.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या या निर्णयामुळे स्थापनेपासून पहिल्यांदाच क्यूआरटी पथकाने मोकळा श्वास घेतला आहे. अधिकाऱ्यांच्या मागे निरर्थक फिरण्याऐवजी आता हे पथक महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी, नियमित सराव आणि जिल्ह्यावरील कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी २४ तास खऱ्या अर्थाने सज्ज राहू शकत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!