24 तासांत बॅनर, पोस्टर्स हटविण्याच्या सूचना नांदेड – औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांनी विविध शासकीय विभागांच्या प्रमुखांना दिले. आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी राजकुमार माने यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पदवीधर, शिक्षक तसेच स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणुकांनाही आदर्श आचारसंहितेच्या तरतुदी लागू आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही शासकीय यंत्रणेकडून आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. पदवीधर मतदारांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पडेल अशी कोणतीही नवीन शासकीय योजना किंवा धोरण जाहीर अथवा मंजूर करू नये. तसेच पदवीधर मतदारसंघातील शैक्षणिक संस्थांचे उद्घाटन किंवा पायाभरणी मंत्री महोदयांच्या हस्ते करू नये. निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना मंत्र्यांच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी बोलावू नये, अशाही सूचना देण्यात आल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांची बैठक किंवा व्हिडिओ कॉन्फरन्स मंत्री महोदयांमार्फत आयोजित करू नये. अत्यावश्यक नियमित बैठका केवळ जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीने घेता येतील, असे स्पष्ट करण्यात आले. नवीन कामांना मंजुरीवर निर्बंध खासदार, आमदार व विधानपरिषद सदस्य निधी योजनेंतर्गत आयटी प्लॅटफॉर्मद्वारे कोणत्याही नवीन कामास मंजुरी देऊ नये. तसेच निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर निवडणूक जाहीर झाल्यापासून पूर्ण बंदी राहील. अपरिहार्य कारणास्तव बदली करणे आवश्यक असल्यास आयोगाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. काळ्या पैशाच्या तसेच पैशाच्या गैरवापराच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रचलित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करावी. मतदारांना हॉटेल, रिसॉर्ट अथवा तत्सम ठिकाणी ठेवण्याची बाब लाचखोरी समजली जाईल. अशा प्रकार आढळल्यास संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई केली जाईल. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून शासकीय मालमत्तेच्या विरुपनास प्रतिबंध केले आहे. महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, नगरपरिषदा, ग्रामपंचायती, महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी, बीएसएनएल तसेच सर्व शासकीय व निमशासकीय विभागांच्या मालमत्तेवर लावण्यात आलेले राजकीय स्वरूपाचे फलक, कापडी बॅनर्स, पोस्टर्स आदी तात्काळ काढून टाकावेत, असे निर्देश देण्यात आले. विभागाच्या अधिनस्त मालमत्तेचे विरुपन झालेले नाही, याची संबंधित विभाग प्रमुखांनी खात्री करून प्रमाणित करावे. त्यानंतरही अशा प्रकारचे लिखाण झाल्यास संबंधि कायद्यानुसार तातडीने कारवाई करावी. कारवाईत कुचराई किंवा दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. शासकीय वाहनांचा गैरवापर टाळण्याचे निर्देश आचारसंहितेच्या काळात कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय वाहनाचा निवडणूकविषयक कामासाठी गैरवापर होणार नाही, याची कार्यालय प्रमुखांनी दक्षता घ्यावी. पदाधिकाऱ्यांची वाहने जमा करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. शाळांच्या मैदानांव्यतिरिक्त नेहमी सभांसाठी वापरली जाणारी मैदाने व मोकळ्या जागा सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांना समानतेच्या तत्त्वावर उपलब्ध करून द्याव्यात, असेही स्पष्ट करण्यात आले. शासकीय विश्रामगृहे, शाळांची मैदाने आणि इतर शासकीय इमारतींच्या वापराबाबत निवडणूक आयोगाने घातलेल्या निर्बंधांचे तंतोतंत पालन करावे. कोणत्याही राजकीय कार्यक्रमासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहू नये, असे निर्देश देण्यात आले. निवडणूक कालावधीत वाहनांचा गैरवापर रोखणे, ताफ्यांचे नियमन करणे तसेच प्रचाराचा कालावधी संपल्यानंतरच्या 48 तासांत राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मतदारसंघातील उपस्थितीवरील निर्बंध या तरतुदी पदवीधर मतदारसंघालाही लागू राहतील. 22 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 22 सप्टेंबर 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे. यासाठी आवश्यक पूर्वतयारी करून आचारसंहिता विषयक पथके स्थापन करावीत, तसेच सर्व सूचना अधिनस्त कार्यालये, अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून काटेकोरपणे पाळल्या जातील, याची दक्षता घ्यावी. विभागाशी संबंधित शासकीय योजना तसेच आचारसंहितेचा भंग करणारे बॅनर, पोस्टर्स अथवा अन्य प्रचार साहित्य आढळल्यास ते 24 तासांच्या आत काढून टाकावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बैठकीत दिले. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर सेवाविषयक नियमानुसार तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 मधील संबंधित तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले. राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचीही बैठक या बैठकीपूर्वी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026 च्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना व आचारसंहितेतील विविध तरतुदींची माहिती देण्यात आली. तसेच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. Kanthak Suryatal Post Views: 22 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अस्वस्थ करणारे प्रश्न अन् अचानक गुंडाळलेली पत्रकार परिषद: अमित शाह महाराष्ट्रात नक्की का घेरले गेले?