नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत उस्माननगर पोलीस पथकाने प्रभावी कारवाई करत विनापरवाना रेतीची वाहतूक करणारा एक भारत बेंज हायवा टिप्पर जप्त केला आहे.
दिनांक १० जुलै २०२६ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, उस्माननगर पोलिसांनी येळी ते महाटी जाणाऱ्या रोडवर महाटी शिवारातील पुलाजवळ सापळा रचला. यावेळी संशयास्पद वाटणारा भारत बेंज हायवा टिप्पर (क्रमांक MH-03-CP6777) अडवून त्याची तपासणी केली असता, कोणताही वैध परवाना नसताना अवैध रेतीची वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.
२० लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त या कारवाईत पोलिसांनी अंदाजे २ ब्रास रेती (किंमत ६,६४४/-) आणि २०,००,०००/- रुपये किमतीचा हायवा टिप्पर, असा एकूण २०,०६,६४४/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी हायवा चालक व मालक धोंडीबा वामन (वय ३५ वर्षे, रा. नांदगाव, ता. लोहा, जि. नांदेड) याच्याविरुद्ध उस्माननगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) आणि खान व गौण खनिज अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईत सहभागी पोलीस पथक ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुळीक, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश पेदेवाड, गंगाधर चिंचोरे, पोलीस कॉन्स्टेबल माधव पवार, आणि संतोष सिदने या अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
नांदेड पोलीस प्रशासनाने जनतेला आवाहन केले आहे की, कोठेही अवैध गौण खनिज उत्खनन किंवा वाहतूक होत असल्याचे आढळल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी.
