नांदेड : राज्यातील सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या २१ जिल्ह्यांमध्ये १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान ” अरुणोदय ” सिकलसेल विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाची ही मोहीम आहॆ. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबवली जात आहॆ. मोहिमे अंतर्गत एकही नागरिक सिकलसेल तपासणीपासून वंचित राहू नये, असे नियोजन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. – मोहिमेचे स्वरूप आणि जिल्हे : सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम सन २००८ पासून प्रामुख्याने आदिवासी व दुर्गम भागात राबविला जात आहे. यामध्ये २१ जिल्ह्यात नांदेड जिल्ह्याचाही समावेश आहॆ. सिकलसेल आजार म्हणजे काय ? सिकलसेल हा एक अनुवंशिक आजार असून तो आई-वडिलांकडून अपत्यांकडे येतो. सामान्यतः रक्तातील लाल पेशी गोलाकार असतात, परंतु सिकलसेल मध्ये त्या विळ्याच्या आकाराच्या व ताठर बनतात. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन खालील समस्या उद्भवतात: – सिकलसेल क्रायसिस: रक्तपुरवठा खंडित झाल्याने असह्य वेदना होणे. – अवयवांचे नुकसान: प्लीहा (Spleen), हाडे, फुफ्फुस, यकृत आणि मेंदूवर गंभीर परिणाम होणे. – रोगप्रतिकारशक्ती: संसर्गाचा धोका वाढणे व रोगप्रतिकारशक्ती कमी होणे. * लक्षणे •:- – रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे. – हाता-पायावर सूज येणे व भूक मंदावणे. – सांधे दुखणे आणि असह्य वेदना होणे. – लवकर थकवा येणे व चेहरा निस्तेज दिसणे. * प्रतिबंधात्मक उपाय :- – विवाहपूर्व तपासणी: लग्नापूर्वी सिकलसेलची तपासणी करणे अनिवार्य आहे. – जोडीदाराची निवड: लाल (SS) आणि पिवळे (AS) कार्ड असलेल्या व्यक्तींनी आपापसात विवाह टाळावा. – गर्भाची तपासणी: सिकलसेल ग्रस्त मातांनी गर्भधारणेनंतर ८ आठवड्यांच्या आत गर्भाची तपासणी करून घ्यावी. * उपचार आणि सवलती :- सिकलसेलवर पूर्ण उपचार नसला तरी योग्य औषधोपचार आणि जीवन शैलीने नियंत्रण मिळवता येते: – फोलिक ॲसिड गोळ्यांचे नियमित सेवन व भरपूर पाणी पिणे (८ ते १० ग्लास). – समतोल आहार : मासे, अंडी, पालेभाज्या, कडधान्ये यांचा आहारात समावेश करणे. – शासकीय लाभ: सिकलसेल रुग्णांना संजय गांधी निराधार योजने अंतर्गत आर्थिक सहाय्य मिळते. १० वी व १२ वीच्या परीक्षेत अशा विद्यार्थ्यांना प्रति तास २० मिनिटे जादा वेळ दिला जातो. तसेच एसटी बस प्रवासात सवलत दिली जाते. * आवाहन :- नागरिकांनी जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन आपली सिकलसेल तपासणी करून घ्यावी. अधिक माहितीसाठी आरोग्य विभागाच्या १०४ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ राजाभाऊ बुट्टे यांनी केले आहॆ. नांदेड आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. Post Views: 838 Facebook WhatsApp Twitter LinkedIn Post navigation “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त; मैदानावर भव्य श्रमदान दोन हजार विद्यार्थ्यांचा ऐतिहासिक श्रमदानात सहभाग