सरकारी पगारात समृद्धीचा नवा पॅटर्न! सार्वजनिक बांधकाम विभागातील गब्बर लिपिक 

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेडच्या सार्वजनिक बांधकाम मंडळात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या ४८ वर्षीय विनोद किशनराव कंधारे यांनी सरकारी सेवेत असताना कमी खर्चात जास्त कमाई करण्याचे अजब तंत्र विकसित केले. १ मार्च २०१० ते १ नोव्हेंबर २०२३ या १३ वर्षांच्या परीक्षण कालावधीत साहेबांनी आपल्या ज्ञात कायदेशीर उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा तब्बल ६५.८३% म्हणजेच ९५ लाख ७४ हजार ८५१ रुपये अधिकची अवैध मालमत्ता जमा करून दाखवली आहे.

लाचेच्या सापळ्यातून उघडकीस आला महाघोटाळा मुदखेड तालुक्यातील पिंपळकौठा येथील एका रहिवाशाने केलेल्या तक्रारीवरून भाग्य नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या यशस्वी सापळा कारवाईत हे वरिष्ठ लिपिक महोदय आधीच अडकले होते. लाचखोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेव्हा या लिपिकाच्या मालमत्तेची उघड चौकशी सुरू केली, तेव्हा त्यांच्या या अथांग आर्थिक प्रगतीची खरी कहाणी समोर आली.

धर्मपत्नीची मोलाची साथ! या अफाट कमाईच्या प्रवासात आरोपी लोकसेवकाला त्यांच्या पत्नी दिपाश्री विनोद कंधारे यांनीही खंबीर साथ दिली. पतीने कमावलेली बेकायदेशीर अपसंपदा स्वतःच्या नावावर बाळगून, या गुन्ह्यात मदत व प्रोत्साहन देण्याचे कर्तव्य त्यांनी चोख बजावले; ज्यामुळे आता पतीसोबत पत्नीवरही अपसंपदेचा गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा दाखल, पण साहेब अजूनही अटकमुक्त! पोलीस निरीक्षक रसुल बशिरसाब तांबोळी यांच्या फिर्यादीवरून भाग्य नगर पोलीस ठाण्यात १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६:१९ वाजता गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि नवीन भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ९५ लाखांहून अधिकची बेकायदेशीर कमाई उघड होऊनही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. सध्या आरोपींच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तपास यंत्रणा आणि अधिकारी सदर उघड चौकशी पोलीस निरीक्षक रसुल तांबोळी यांनी केली असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप अधीक्षक राहुल तरकसे करत आहेत. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन जर तुम्हालाही अशाच कमावू लाचखोर लोकसेवकांचा अनुभव येत असेल, तर नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड, नागार्जुन सागर बिल्डिंग, स्नेहनगर, दूरध्वनी 02462-253512 किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!