नागरिकांना मोठा दिलासा नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या अडीअडचणी व तक्रारी ऐकून घेण्यासाठी आयोजित विशेष जनसुनावणीत पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्यासमोर ४२ नागरिकांनी आपली गाऱ्हाणी मांडली. ४२ हा आकडा वृत्त लिहीपर्यंतचा आहे. विशेष पोलीस उपमहानिरीक्षकांनी सर्व तक्रारदारांची अत्यंत आस्थेवाईकपणे चौकशी केली. काहींच्या तक्रारींवर चौकशीचे आदेश दिले, तर काहींचे प्रश्न त्वरित सोडवून देण्याचे आश्वासन दिले. प्रत्येक नागरिकाचे समाधान होईल अशाच प्रकारे त्यांनी उपस्थित तक्रारदारांना मार्गदर्शन केले. जनसुनावणीदरम्यान पोलीस अधिकाऱ्यांना आदेश या जनसुनावणीदरम्यान उपस्थित असलेले सर्व पोलीस उपाधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांना संबंधित तक्रारींचा कसा आणि काय सोक्षमोक्ष लावता येईल, याविषयी शहाजी उमाप यांनी घटनास्थळीच स्पष्ट आदेश जारी केले. डीआयजींच्या या तत्पर आणि सहानुभूतीपूर्वक भूमिकेमुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. प्रकरणांवर लवकरच योग्य निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त करत उपस्थित नागरिकांनी शहाजी उमाप यांचे आभार मानले व त्यांना धन्यवाद दिले. महत्त्वाच्या प्रकरणांवर त्वरित निर्णय कॅन्सरग्रस्त महिलेच्या तक्रारीची तातडीने दखल: जनसुनावणीत आलेल्या डॉ. शाहीना जबीन या कॅन्सरग्रस्त महिलेने ओमकान्त चिंचोलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून होणाऱ्या वाईट वर्तणुकीबद्दल व त्रासाबद्दल आपबीती सांगितली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून शहाजी उमाप यांनी या चौकशीची जबाबदारी इतवारा उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक प्रशांत शिंदे यांच्याकडे सोपवली आहे. गहाळ मुलीच्या कुटुंबास मोठा दिलासा: एका मुलीच्या गहाळ प्रकरणात, संबंधित कुटुंबाची आपल्या मुलीशी कमीत कमी एकदा बोलणी करून द्यावी जेणेकरून मुलगी कशी आहे हे कळावे, ही मागणी होती. ही मागणी डीआयजी उमाप यांनी एका झटक्यात मान्य करत पोलीस उपाधीक्षक श्याम पानेगावकर यांना त्या कुटुंबाचे मुलीशी तात्काळ बोलणे करून देण्याचे निर्देश दिले. गोठवलेले पैसे परत करा एका सायबर प्रकरणातील फिर्यादीने आपली तक्रार सायबर शाखेतून बदलून स्थानिक गुन्हा शाखेला देण्याची विनंती पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांना केली. पण शहाजी उमाप यांनी सांगितले की, हा सायबर गुन्ह्याचा प्रकार आहे. म्हणून हा गुन्हा स्थानिक गुन्हा शाखेकडे वर्ग करता येत नाही. त्यावेळी सायबर शाखेचे पोलीस निरिक्षक वसंत सप्रे यांनी शहाजी उमाप यांना त्यातील काही कागदपत्रे दाखवत सांगितले की, या गुन्ह्यातील काही रक्कम गोठवण्यात आली आहे. तेंव्हा शहाजी उमाप यांनी सांगितले की गोठवलेली रक्कम त्वरीत पिडीताला देण्यात यावी. या संदर्भाने तक्रारदाला अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांना भेटण्या संदर्भाने सांगितले. चार जिल्ह्यांतील जनतेसाठी दरमहा उपक्रम विशेष म्हणजे, नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चारही जिल्ह्यांतील जनतेसाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप दर महिन्याला एक दिवस स्वतः उपलब्ध राहतात आणि नागरिकांची रखडलेली प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लावतात. जनसुनावणी संपल्यानंतर त्यांनी उपस्थित सर्व पोलीस अधिकाऱ्यांनाही स्वतः सोपवलेल्या कामांवर लवकरात लवकर निर्णय घेण्याच्या आणि प्रकरणांचा निकाल लावण्याच्या कडक सूचना दिल्या. या जनसुनावणीत प्रभारी अधीक्षक अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव जिल्ह्यातील सर्व पोलीस अधीक्षक,शहरातील पोलीस ठाण्यांचे सर्व पोलीस निरीक्षक,आसपासच्या पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते . Kanthak Suryatal Post Views: 109 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सोनिया गांधी भडकल्या! CWC च्या बैठकीत नितीश कुमारांचा बुरखा फाडला; गद्दार म्हणत केला घणाघाती प्रहार! न्यायालयाचा जैसे थे आदेश खिशात अन् मनपाची दादागिरी मैदानात! अजब पालिकेचा गजब कारभार;शाहजी उमपांनी घेतली दखल