नांदेड (प्रतिनिधी)- भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त आज शहरात जैन समाजातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळपासूनच जैन बांधवांनी महावीर मंदिरासह शहरातील विविध जैन मंदिरांमध्ये पूजा-अर्चा, अभिषेक व धार्मिक विधी करून भगवान महावीरांना वंदन केले. यावेळी भाविकांसाठी प्रसादाचेही वाटप करण्यात आले.
यानंतर जैन समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. भगवान महावीरांच्या प्रतिमेची सजवलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. वाजत-गाजत, धार्मिक घोषणांनी व भक्तीमय वातावरणात ही शोभायात्रा शहरातून मार्गक्रमण करत महावीर चौकापर्यंत पोहोचली. नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत करून सहभाग नोंदवला.
महावीर चौक येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. या महोत्सवामुळे शहरात उत्साह, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचे वातावरण निर्माण झाले. जैन समाजातील मोठ्या संख्येने महिला, पुरुष व युवकांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

