नांदेड : महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून प्रसिद्धीसाठी पाठवण्यात आलेल्या एका अधिकृत बातमीमुळे शहरात प्रशासकीय गोंधळ आणि पक्षपातीपणाचा आरोप पुन्हा एकदा समोर आला आहे. खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन झाल्याची माहिती देणाऱ्या या बातमीत प्रोटोकॉलचा सरळसरळ भंग झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
सदर प्रसिद्धीपत्रकात नांदेडचे महापौर अमरनाथ राजूरकर यांचा उल्लेख “महापौर तथा महानगराध्यक्ष” असा करण्यात आला असून, त्यानंतरच इतर पदाधिकाऱ्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रशासकीय परंपरेनुसार महापौर, उपमहापौर, सभापती आणि नगरसेवक यांना त्यांच्या अधिकृत पदक्रमानुसार अग्रक्रम दिला जातो. मात्र, जनसंपर्क विभागाने पक्षीय पदाला प्राधान्य देत अधिकृत पदांचा क्रम मागे टाकल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
महापालिकेच्या वर्तुळात या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त होत असून, “महानगराध्यक्ष हे पक्षीय पद आहे, तर महापौर हे संवैधानिक पद आहे. मग अधिकृत प्रसिद्धीपत्रकात असा उलटसुलट क्रम कसा?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. हा केवळ दुर्लक्षाचा प्रकार आहे की जाणीवपूर्वक ‘खुशामत’ करण्याचा प्रयत्न, याबाबतही चर्चा रंगली आहे.
याशिवाय, जनसंपर्क विभागात पत्रकारितेचा अनुभव नसलेल्या अधिकाऱ्यांकडून कामकाज पाहिले जात असल्यामुळे अशा चुका वारंवार घडत असल्याची टीका देखील पुढे येत आहे. अनेक वर्षांपासून लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडेच या विभागाचा कारभार असल्याची चर्चा असून, त्यातूनच अशा प्रकारचे गोंधळ निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.
नांदेडसारख्या महत्त्वाच्या शहराच्या महापालिकेत अधिकृत माहिती देताना अशा प्राथमिक बाबींकडे दुर्लक्ष होणे ही गंभीर बाब मानली जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, आणि भविष्यात अशा प्रकारांना आळा बसणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
