विमान कोसळले. 250 पेक्षा जास्त माणसे जळून खाक झाली . ही बातमी वाचत असता अगदी माझ्या घरातील माझी आई, संग्राम ची आई अशी अकस्मात निघून गेली ही आठवलं. विमान दुर्घटना पाहून अनेकाना प्रश्न पडला की मग हा जन्मच का? जगायचं का? याचे उत्तर कोणीतरी द्यायला पाहिजे असे आमच्यासारख्या सामान्य माणसाला वाटायला लागते. विमानातील सगळी माणसं जळून खाक झाली पण भगवद्गीता हा ग्रंथ तिथे मिळाला असे दाखविले जात आहे. भगवद्गीता, कुराण,….., हे आमचे पवित्र ग्रंथ का जगायचे? अशा घटना का घडतात? व त्यातून आपण काय संदेश घ्यायचा हे तरी सांगतात का? माझ्या तुट पुंज्या अभ्यासानुसार मुळीच नाही. भगवद्गीते अनुसार ते जळून खाक झाले ते ‘कर्मफल सिद्धांता’ नुसार. पूर्वजन्मी त्यांनी पाप केले होते म्हणून त्याचे त्यांना या जन्मी हे फळ मिळाले. पूर्व जन्माच्या कर्माचे फळ!
कुराण आणि इस्लाम धर्मानुसार अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे. तो विश्वाचा निर्माता आणि त्राता आहे . झाडाचे पान सुद्धा अल्लाच्या इच्छा / आज्ञे शिवाय हालत नाही!
बहुतेक मुस्लिम अल्ला की मर्जी म्हणून शांत राहतात.
निरपराध माणसांना मारण्याची इच्छा या अल्लाह मध्ये निर्माण का होते याबद्दल मी अनेक मुस्लिम विद्वानांना प्रश्न विचारला पण त्यापैकी कोणीही त्याचे समर्पक उत्तर दिले नाही . बौद्ध धर्म देव मानत नाही पुनर्जन्म मानत नाही त्यामुळे बऱ्यापैकी समाधानकारक उत्तर मिळते पण त्या व इतर धर्मांचा माझा अभ्यास नाही.
जगणं निरर्थक आहे व त्याचे उत्तर धर्म देत नाही म्हणून जगात सगळ्यात जास्त लोकसंख्या नास्तिकांची आहे. मग हे लोक कोठून जगण्याची उर्मी मिळवितात?
औद्योगिक क्रांतीनंतर युरोप मधील लोकांचा धर्मावरील विश्वास उडाला. मोठी पोकळी निर्माण झाली. त्यातूनच जगायचं का यावर आणि मानवी अस्तित्वावर विचार करणाऱ्या अनेक विचारवंतांनी अस्तित्व वाद (existancialism ) या विषयावर लिखाण केलेले आहे. अल्बर्ट कामू यांचा ” आणि सीशीफस आनंदी झाला” हा निबंध वाचायला मिळाला. ही एक ग्रीक पुराणातील सीशीफस नावाच्या राजाची कथा आहे.त्याने देवांना फसविले होते. त्यामुळे देवांनी त्याला पुन्हा पृथ्वीवर पाठवले आणि संपूर्ण आयुष्यभर निरर्थक वाटेल असे काम करायची शिक्षा दिली. अशा निरर्थक कामातही तो कसा सुखी राहिला याची ती बोधकथा. भोवताली अशा घटना घडत असताना प्रत्येकाला जगायला उर्मी देणारी वाटली.
– सुरेश खोपडे