नांदेड(प्रतिनिधी)–शहरातील प्रभाग क्रं.18 मध्ये देगावचाळ येथे मागील दहा ते पंधरा दिवसापासून रस्त्यावरील स्ट्रिट लाईट बंद पडली आहे. शिवाय खडकपुरा, भिमघाट, पंचशिल नगर आदी भागात ठिकठिकाणी नाल्या तुंबलेल्या आहेत त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले असून स्ट्रिट लाईट सुरू करून प्रभागातील रस्ते, नाल्यांची साफसफाई तात्काळ करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बंटीभाऊ लांडगे यांनी केली आहे.
मागील काही दिवसांपासून मृग नक्षत्र सुरू झाला आहे. पहिलाच पाऊस झाला त्या पावसातच महापालिकेतील मान्सूनपुर्व कामाचा फजा उडाला. प्रभाग क्रं.18 मधील खडकपुरा, भिमघाट, पंचशिल नगर, भैय्यासाहेब आंबेडकर नगर, दुलेशाह रहेमाननगर, पक्कीचाळ, गंगाचाळ, नलागुटाचाळ, देगावचाळ या भागामध्ये ठिकठिकाणी नाल्या तुंबलेल्या आहेत. शिवाय अनेक ठिकाणी ड्रेनेज फुटले आहेत त्यामुळे रस्त्यावरून पाणी जात आहे. जागोजागी कचर्याचे ढिगारेही साचले आहेत त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देवून नागरिकांना सोयी उपलब्ध करून द्याव्यात शिवाय देगावचाळ या भागात मागील दहा ते पंधरा दिवसापासून रस्त्यावरील स्ट्रिट लाईट बंद झाल्या आहेत त्यामुळे हा भाग अंधारमय झाला आहे. या संधीचा फायदा परिसरातील भुरटे चोर घेतांना दिसत आहे. स्ट्रिट लाईट संदर्भात महावितरणला विचारणा केली असता महावितरण महापालिकेकडे बोट दाखवित आहेत. तर महापालिका हे काम महावितरणचे आहे असे सांगून जबाबदारी झटकून टोलवाटोलवी करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणात महापालिका आयुक्तांनी लक्ष देवून तात्काळ प्रश्न सोडवावेत अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने आंदोलन करण्यात येईल असा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बंटीभाऊ लांडगे यांनी दिला आहे.