नागपूर (प्रतिनिधी) – येथील क्रांतीकारी संत कबीर राष्ट्रीय पुरस्काराने अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांना नागपूर येथे नुकतेच सन्मानित करण्यात आले.
क्रांतीकारी संत कबीर वाचनालय कामठी नागपूरच्या वतीने सिद्धार्थ बुद्ध विहार सभागृह कामठी नागपूर येथे संत कबीर यांच्या ६२७ व्या जयंतीनिमित्त मेगा फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते, त्यात साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असल्याबद्दल इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांचा संत कबीर राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
मेगा फेस्टिव्हलचे स्वागताध्यक्ष व सुप्रसिद्ध राष्ट्रीय कवी मधू बावलकर, सावित्रीमाई फुले यांचे वारस डाॅ. दिलीप नेवसे पाटील (सातारा), नॅशनल भीम आर्मी बहुजन एकता मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकेश कटारिया, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सौ. सुरेखा खंडारे, मानवाधिकार आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी न्यायाधीश शिवदास नारायण महाजन, पुणे येथील सत्यशोधक कार्यकर्ते रघुनाथ ढोक, उत्तर प्रदेशातील हापूड येथील सुप्रसिद्ध गायक बी. डी. संगम, कार्यक्रमाचे आयोजक प्रदिप फुलझेले आदींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या पूर्वी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सिद्धार्थ बुद्ध विहारापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. प्रदीप फुलझेले यांच्या परिवारात ५३ वर्षानंतर मुलीचा जन्म झाला म्हणून तिचे भव्य स्वागत यावेळेस करण्यात आले.
लोणी ता. अर्धापूर जि. नांदेड येथील पत्रकार गंगाधर घनःश्याम सोनटक्के, कामारी ता. हिमायतनगर जि. नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते त्रिरत्नकुमार भवरे यांनाही यावेळी संत कबीर राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले.
कार्यक्रमास नागपूर येथील अ. भा. गुरु रविदास समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अरविंद तायडे, लोणी येथील विजय सोनटक्के, शिवराज सोनटक्के, वाचनालय समितीचे सचिव नामदेव पख्खीडे, उपाध्यक्ष चक्रधर रामटेके, कोषाध्यक्ष भीमराव नंदेश्वर आदींची प्रमुख उपस्थिती होती.