शेतकऱ्यांनी डीएपी खतास पर्यायी खते वापरावीत

नांदेड  चालू खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केवळ डीएपी खतावरच अवलंबून न राहता बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य हे मृद परीक्षण व जमीन आरोग्य पत्रिकांचे आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली वापरासाठी अग्रेसर आहे. राज्यामध्ये सद्या पेरणीला सुरुवात झाली असून डीएपी खताची शेतकऱ्यांकडून जास्त मागणी आहे. डीएपी खतामध्ये 18 टक्के नत्र तर 46 टक्के स्फुरद ही अन्नद्रव्य आहेत.

डीएपी खताची कमतरता भरुन काढण्यासाठी पर्यायी खत वापरणे गरजेचे आहे. स्फुरद युक्त खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी या खताची सर्वाधिक मागणी आहे. एसएसपी खत हे देशातंर्गत तयार होत असून यामध्ये स्फुरद 16 टक्के सह सल्फर व इतर सुक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात. सल्फर अन्नद्रव्यामुळे तेलबिया पिकांमध्ये एसएसपी खताचा वापर फायदेशीर ठरणार आहे. डीएपी खताच्या एका गोणीऐवजी युरिया अर्धी गोणी व एसएसपी तीन गोणी खतांचा वापर डीएसपीस चांगला पर्याय आहे.

एसएसपी बरोबरच संयुक्त खते जसे की एनपीके 10:26:26, एनपीके 20:20:0:13, एनपीके 12:32:16 व एनपीके 15:15:15 या खतांच्या वापरामुळे नत्र व स्फुरद बरोबरच पालाश हे अन्नद्रव्य सुध्दा पिकांना उपलब्ध होते. त्यामुळे या संयुक्त खतांचा वापर केल्यास पिकांसाठी पोषक ठरतो. त्याच बरोबर टीएसपी या खतामध्ये 46 टक्के स्फुरद अन्नद्रव्यांची मात्रा असून डीएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व टीएसपी एक गोणी खतांचा वापर केल्यास तो देखील डीएपी खतास उत्तम पर्याय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!