गोदावरी नदीपात्रात उठणारा उग्रवास जनतेसाठी आजारपण

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात आज संत दासगणु पुलावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांनी केलेल्या तक्रारीप्रमाणे नदीतून एवढा उग्र वास येत आहे की, तो घाणेरडा वास ड्रेनजचा असेल असे जनतेतील लोक सांगत आहेत. त्या शिवाय सुध्दा नदीपात्रात अत्यंत घाणेरड्या वस्तु पडून आहेत. त्यामुळे गोदावरी नदी मैली झाली आहे.
आज दिवसभर नांदेड शहरातील संत दासगणु पुलावरून जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांना आपल्या नाकाला कपडा बांधावाच लागत होता. यासंदर्भाची माहिती घेतली तेंव्हा त्या ठिकाणी नदीपात्रातून येणारा उग्रवास लोकांना सहन होत नव्हता. त्या ठिकाणी नदीमध्ये वाकून पाहिले असता अत्यंत घाण अशा वस्तु त्यात पडलेल्या दिसत आहेत. सोबतच जनतेतील लोकांनी सांगितल्याप्रमाणे नदीपात्रात ड्रेनेजचे पाणी सोडले असावे. त्यामुळेच हा वास येत असल्याचे नागरीक सांगत होते.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका भौतिक सुविधांसाठी जनतेकडून कर वसुल करते. कर उशीरा भरला तर त्यावर शास्ती लागते. दोनदा लोक अदालत घेवून तुमची प्रकरणे संपवून टाकू असे सांगून जनतेकडून कोट्यावधी रुपयांचा कर वसुल केला. परंतू त्यांची प्रकरणे आहेत तशीच आहेत कोणीही त्या प्रकरणांचा अंत करून करदात्याला मुक्त करण्याची इच्छा ठेवणारा अधिकारी महानगरपालिकेत नाही.
आज संत दासगणु पुलावरुन जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांच्या नाकाद्वारे आत शिरलेला तो उग्रवास त्यांना काही आजार आणेल तर त्याचा जबाबदार कोण हा प्रश्न सुध्दा महत्वपुर्ण आहे. वातानुकूलीत कक्षात बसून आम्ही जनतेसाठी राब-राब राबतो आहोत असे सांगणे वेगळे आणि जनतेच्या समस्या सोडविणे वेगळे असेच आहे भारताच्या लोकशाहीचे धिंडवडे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!