कुंभमेळ्यातील खरे मृत्यूंचे आणि बेपत्त्यांचे आकडे शासन नुकसान भरपाई भितीपोटी जाहीर करत नाही

कुंभमेळ्यात सरकार सांगते 30 मृत्यू झाले. काही युट्यूब चॅनेल दाखवतात 68 मृत्यू झाले. आज 50 तासांपेक्षा जास्त वेळ झाल्यानंतर शासनाच्या अभिलेखाप्रमाणे 822 नागरीक बेपत्ता आहेत. इतरांच्या माहितीप्रमाणे 1500 भाविक बेपत्ता आहेत. खरी माहिती सांगण्यास शासन का भित आहे, याला उघड करताना अनेकांनी आपआपली मते मांडली. त्यात नुकसान भरपाई घेणाऱ्यांची संख्या वाढेल, सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळ होईल, अशी अनेक कारणांनी सत्यता लपविली जात आहे. परंतु सत्यता काही दिवसच लपते. पुढे ती समोर येतच असते. शासनाने आता तरी आमचे चुकले होते, असे सांगून जनतेची क्षमा मागावी, असे मत उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक विभुती नारायण रॉय यांनी सांगितले आहे.

दै. भास्करच्या बातमीप्रमाणे 30 जानेवारी रोजी 850 जण कुंभमेळ्यात गायब झालेले आहेत. इतर काही जणांच्या सांगण्याप्रमाणे हा आकडा 1500 आहे. आजही 2 फेब्रुवारी रोजी शेकडो लोक आपल्या नातलगांचा शोध घेत आहेत. वेगवेगळ्या दवाखान्यात फिरून तेथे असलेल्या प्रेतांना पाहू द्या, अशी विनंती करत आहेत, परंतु दवाखान्याबाहेर मृतांचे काही फोटो लावलेले आहेत, त्यावरून तुम्ही ओळखा असे त्यांना सांगितले जात आहे. पत्रकारांना तर शवागारात जाऊ दिले जात नाही, त्यांना धक्काबुक्की होत आहे, प्रसंगी मी त्यांना अटक करेल अशा धमक्या दिल्या जात आहेत. त्यात एका सॅटेलाईट वृत्तवाहिनीचा पत्रकार बिपीन दुबे सुद्धा आहे. उत्तर प्रदेश शासनाने ते सांगतात त्या 30 जणांची नावे अद्याप जाहीर केली नाहीत. तसेच बेपत्ता झालेल्यांची सविस्तर माहिती सादर केली जात नाही. काय कारण असेल याचे. तर सांगितले जात आहे की, नुकसान भरपाई मागणाऱ्यांची संख्या वाढेल आणि त्यामुळे शासन त्रासात येईल. परंतु आज मोबाईलचा जमाना आहे, ज्यादिवशी चेंगराचेंगरी झाली, त्या भागात किती मोबाईल चालू होते आणि आज किती बंद आहेत, याचा डाटा काढतो येतो. म्हणजे पुन्हा शासन कुठे तरी खोटे ठरेल. या सर्व गोष्टींचा खरा तपास होणे आवश्यक आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या पसंतीचे एक न्यायाधीश निश्चित करून न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. परंतु आजपर्यंतच्या न्यायालयीन चौकशींचा अभ्यास केला तर या न्यायालयीन चौकशींचे काय होईल, हे लक्षात येईल.

तेथे एकाच कुटूंबातील दोन जणांचा मृत्यू झाला तेव्हा त्या दोन प्रेतांना नातलगांच्या स्वाधीन करण्यात आले. परंतु झालेल्या गडबडीमध्ये त्यांच्याकडे पैसे नव्हते, तेव्हा त्यांनी प्रशासनाला सांगितले की, आम्हाला घरी पोहचण्यापुरते पैसे द्या. परंतु त्यावर त्यांना काहीच उत्तर मिळाले नाही. शासनाने मरण पावलेल्यांना 25 लाख रूपये देऊ असे जाहीर तर केले आहे, परंतु मृतदेहांनाच घरी पोहचवायची सोय नाही. तर अशा परिस्थितीत त्या 25 लाखांची किंमत काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. अनेक कारणांनी वादग्रस्त असलेला अधिकारी विजय चरण आनंद यास कुंभमेळा परिसराचे प्रमुख बनविले. तो अगोदरच वादातीत आहे, त्याकडून चांगल्याची अपेक्षा कशी करता येईल. प्रयागराजमधील पत्रकार शीतल सिंह सांगतात प्रयागराजमध्ये एक कोटी लोक तर रस्त्याने चालणे अवघडच होईल. आणि अशी परिस्थिती तेथेच आहे. सर्वसामान्य माणसांना 20-20 कि.मी. पायी चालून नदीपर्यंत पोहचता येते. चेंगराचेंगरीची घटना एकाच जागी घडली नसून तीन जागी घडली आहे. यावरून प्रशासनाला भाविकांच्या सोयीसाठी योग्य तयारी करताच आली नाही, हे स्पष्ट झाले. ज्या भाविकांचा मृत्यू झाला. त्यांचा जीव यमदेवाने नेला असेल, परंतु त्यांचा मोबाईल, त्यांचे कपडे, त्यांच्या बॅगा, तेथेच होत्या. त्यांना ट्रकमध्ये भरून नेण्यात आले आहे. म्हणून ज्यांना इमानदारीने या प्रकरणांचा छडा लावायचा आहे, ते लाऊच शकतात. परंतु इमानदारी आवश्यक आहे, अशी कुंभमेळ्याच्या घटनेवर प्रतिक्रिया फिरत आहे. हजारो कोटी रूपये खर्च करून अभेद्य सुरक्षा व्यवस्था तयार करण्यात आल्याच्या वल्गना उत्तर प्रदेश प्रशासनाने केल्या. परंतु तेथे लावलेले हजारो सीसीटीव्ही खरे सांगतीलच ना. पण त्याचे फुटेज सरकारने जाहीर करायला हवे. पुन्हा येथे इमानदारी हा प्रश्न आलाच. पोलीस अधिकारी सांगतात की, घटनेची माहिती आम्हाला मिळाली नाही. पण एक महिला पोलीस ओरडून ओरडून वॉकी टॉकीवर अतिरिक्त मनुष्यबळ पाठवा हे सांगत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या कुंभमेळ्यात ज्या मुस्लिम समाजाला नो एन्ट्री होती, त्यातील काही लोकांनी हुसेनी इंटरनॅशनल कॉलेजमध्ये कुंभमेळ्यातील त्रासलेल्या भाविकांच्या जेवणाची सोय केली. त्यांचे नाव अख्तर अन्सारी असे आहे. ऐवढेच नव्हे तर त्यांनी प्रत्येकाला भेटून-भेटून त्यांच्या समस्यांवर काय साथ देता येईल, हे जाणुन घेतले आहे. यावर भाजपचे सुधांशू त्रिवेदी म्हणतात मुर्ती पुजेसाठी आलेल्या लोकांची सेवा जर मुस्लिम समाजाने केली तर ते त्यांच्या धर्मातून भ्रष्ट होतील, पण बहुदा त्रिवेदीला हे माहित इस्लाम धर्मामध्ये आपल्या शेजाराचा व्यक्ती जेवला की नाही, याची माहिती घेऊनच त्यांनी स्वत: जेवण करायचे अशी शिकवण दिली आहे. धिरेन शास्त्री सांगतात नदीकाठी मृत्यू झाला म्हणजे मोक्ष मिळाला. या एका वाक्यावर दोन तास चर्चा करता येईल. शास्त्री अगोदर सांगत होते, जो कोणी कुंभमेळ्यात येणार नाही, तो देशद्रोही असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला कुंभमेळ्यातील पाच फेब्रुवारीचा दौरा रद्द केला आहे. म्हणजे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा देशद्रोही होतील काय ? या कुंभमेळ्यामध्ये 50 हजार, 1 लाख या दराने राहण्यासाठी 12 तासांचे टेन्ट मिळत होते. ही टेन्ट नगरी जळाल्यानंतर ही बाब समोर आली की, हे टेन्ट नगरीच अवैध होती. असे अनेक प्रकार या कुंभमेळ्यात घडले आहेत. ज्यावर चर्चा करायला घेतली तर पुढचा कुंभमेळा येईल.

सध्याच्या युगात दै. जागरण या वृत्तपत्राची दररोजची 5.5 कोटी अंकांची छपाई होते, अर्थात त्या वृत्तमान पत्राला देशात प्रथम क्रमांक आहे. त्याने सुद्धा कुंभमेळ्यातील दुर्घटनेच्या बातमीला स्थान दिले नाही. असाच काहीसा प्रकार द टाईम्स ऑफ इंडियाने सुद्धा केला. मग इतरांकडून काय अपेक्षा. का त्यांनी स्थान दिले नाही, याचा शोध कोण घेईल, सॅटेलाईट प्रसारमाध्यमे आता अर्धवट बातम्या देत आहेत. परंतु खरी बातमीदारी युट्यूब पत्रकारांनी केली. आणि त्यांच्यामुळेच आज कुंभमेळ्यातील दुर्घटनांना वाचा फुटली आहे. भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानल्या गेलेल्या पत्रकारितेला किती वाईट दिवस आले आहेत, हे यावरून दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!