नांदेड(प्रतिनिधी)-दि. २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान जैन विद्यापीठ बँगलोर येथे संपन्न झालेल्या ३६ व्या अखिल भारतीय राष्ट्रीय युवक महोत्सवामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने चमकदार कामगिरी करून घवघवीत यश प्राप्त केले. या युवक महोत्सवात भारतभरातून आलेली सर्व राज्य आणि ८ झोन मधून सहभगी झालेली १०८ विद्यापीठे सहभागी होती.
या चुरसदार स्पर्धेतून संकेत गाडेकर या विद्यार्थ्यांने स्थळ छायाचित्रण या कलाप्रकारात भारतातून प्रथम क्रमांक पटकाविला त्यांना श्री. सिद्धार्थ नागठाणकर यांचे मार्गदर्शन लाभले. सुमित हसाळे या विद्यार्थ्याने नक्कल या कलाप्रकारात संपूर्ण भारतामधून सर्व द्वितीय क्रमांक पटकावून रजत पदक प्राप्त केले त्यांना राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्री. दिलीप डोंबे यांचे मार्गदर्शन लाभले. या महोत्सवात मेहंदी या कलाप्रकारात शिवराज मुधोळ या विद्यार्थ्यांने अत्यंत सुरेख अशी मेहंदी काढून फायनल राऊंड पर्यंत मजल मारली परंतु अवघ्या काही गुणांनी त्याचे बक्षीस हुकले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी एक गोल्ड आणि एक सिल्वर पदक जिंकून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर वाढविले. या संघासोबत संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. विजय पवार यांनी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
अखिल भारतीय राष्ट्रीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवामध्ये विद्यापीठाच्या संघाने घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, अधिष्ठाता डॉ.अजय टेंगसे, अधिष्ठाता डॉ. एल.एम.वाघमारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. श्रीकांत अंधारे, क्रीडा संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, डॉ.संदीप काळे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम आदीनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शाबासकी दिली आणि त्यांचे अभिनंदन करून पुढील आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.