नांदेड(प्रतिनिधी)-10 शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या विविध योजनांची भुल देवून त्यांच्याकडून 32 लाख 90 हजार रुपये उकळणाऱ्या दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघे गुन्हेगार रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
राजेश हनमल्लु बोलनवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 फेबु्रवारी 2023 रोजी ते 28 फेबु्रवारी दरम्यान कुबेर लॉज रेल्वे स्टेशन जवळ किनवट येथे श्रध्दा अमोल निघोट आणि त्यांचे पती अमोल मोरेश्र्वर निघोट दोघे रा.सार्थ रेसीडन्सी, गणेश बाजार, भगवा चौक पाग चिपळून जि.रत्नागिरी (कोकण) यांनी राजेश बोलनवारसह इतर नऊ शेतकऱ्यांचा विश्र्वास संपादन करून राज्य शासनाच्या पोकरा व एकात्मीक फल उत्पादन अभियान या शासकीय योजनेअंतर्गत पॉलीहाऊस व शेडनेट बसवून देण्यासाठी आयडीबीआय बॅंक शाखा चिपळून येथील श्रध्दा अमोल निघोटच्या बॅंक खात्यावर 32 लाख 90 हजार रुपये आरटीजीएस माध्यमाने भरायला लावले. परंतू पुढे त्यांनी काहीच काम केले नाही म्हणून याबाबत दिलेल्या तक्रारीवरुन श्रध्दा आणि अमोल निघोट या दोघांविरुध्द किनवट पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 55/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक बोरसे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक सावंत यांच्याकडे देण्यात आला आहे.
