ताज्या बातम्या नांदेड

वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंम योजना

नांदेड,(प्रतिनिधी)- वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी “पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना” अंतर्गत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 15 मार्च 2023 आहे. विहित मुदतीनंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांनी केले आहे.

महानगरपालिका विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना सन 2019-20 या शैक्षणिक वर्षांपासुन इयत्ता 12 वीनंतरच्या मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना “पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना” अंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

 

सदर योजनेची अटी व निकष पुढील प्रमाणे आहेत. विद्यार्थी धनगर समाजातील असावा, विद्यार्थ्यांना अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2 लाख 50 रुपयापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे. अशा ठिकाणचा विद्यार्थी रहिवासी नसावा. विद्यार्थी इयत्ता 12 नंतरचे तंत्र व व्यावसायिक शिक्षण घेणारा असावा. इयत्ता 12 वी मध्ये किमान 60 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी या योजनेस पात्र राहतील. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाचा कालावधी 02 वर्षापेक्षा कमी नसावा. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी संबंधीत विद्यार्थ्यांने इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती किमान 60 टक्के असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय 28 वर्षापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांस आदिवासी विकास विभागाच्या सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधीत शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नसावा. धनगर समाजातील दिव्यांग विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ प्राधान्याने देय राहील. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा. संबंधित विद्यार्थ्यांने व शैक्षणिक संस्थेने महाडीबीटी पोर्टलवर भारत सरकार शिष्यवृत्तीचा ऑनलाईन ऑनलाईन पध्दतीने संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्याकडे अर्ज करणे अनिवार्य राहील. त्याचप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी शिष्यवृत्तीचा योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरलेले विद्यार्थीच या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरतील.

नांदेड महानगरपालिका क्षेत्रामधील मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण व व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या शासकीय तसेच अनुदानित महाविद्यालयांमध्ये केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेवुन शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी सन 2022-23 करीता अर्ज करण्याचे आवाहन अध्यक्ष निवड समिती तथा जिल्हाधिकारी नांदेड तसेच सदस्य सचिव निवड समिती तथा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड यांनी केले आहे.

 

या योजनेचे अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर, अर्धापुर रोड, नांदेड येथे 27 फेब्रुवारी 2023 ते 15 मार्च 2023 या कालावधीत (कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळुन) संबंधीत विद्यार्थ्यांना वाटप केले जातील.

अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नांदेड यांचेशी संपर्क साधावा.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *