पुढील सुनावणी 23 मार्च 2023 रोजी
औरंगाबाद(प्रतिनिधी)-सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात “तारिख पे तारीख’ मिळत आहे. असाच सत्तेचा छोटासा संघर्ष नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीसाठी सुरू आहे. त्यातही मॅट न्यायालयाने तारीखच दिलेली आहे. आता पुढील सुनावणी 23 मार्च 2023 रोजी सुनिश्चित करण्यात आली आहे. पण या सत्तासंघर्षात दोन पोलीस निरिक्षक अडकले आहेत.
नांदेडच्या गुन्हा शाखेच्या खुर्चीसाठी सुरू झालेला सत्तासंघर्ष 17 फेबु्रवारीपासून चर्चेत आला. त्यात 18 फेबु्रवारी रोजी पोलीस अधिक्षकांनी पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पोलीस उपनिरिक्षकांच्या बदल्या केल्या. या बदल्यांमध्ये स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे देण्यात आले. नांदेड ग्रामीणचे मागील दोन वर्षापेक्षा जास्त तोंडी आदेशावर तेथे कार्यरत असलेले पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेबांना अर्धापूर पोलीस ठाणे देण्यात आले. वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांना स्थानिक गुन्हा शाखा खुर्ची बहाल करण्यात आली. त्यानंतर या सत्तासंघर्षाला जास्त जोर आला. मुंबईहुन प्रयत्न करण्यात आले पण सत्तासंघर्षाची कुणकुण लागलेल्या द्वारकादास चिखलीकर यांनी मॅट न्यायालयात 20 फेबु्रवारी रोजी याचिका दाखल करून स्थगिती मागितली. 21 फेबु्रवारी रोजी त्यांची स्थगिती मंजुर झाली. 24 फेबु्रवारी रोजी ते पुन्हा आपल्या कामावर हजर झाले. आज या मॅट कोर्टातील सुनावणी होती. प्राप्त माहितीनुसार आजची सुनावणी न्यायालयाने 23 मार्च 2023 रोजी सुनिश्चित केलेली आहे. मॅट कोर्टात आज पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यावतीने याचिकेबद्दलचे म्हणणे मांडलेले आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात सर्वोच्च न्यायालयात तारीख पे तारीख असे सुरू आहे. असाच प्रकार आता महाराष्ट्र न्यायाधीकरण (मॅट) येथे स्थानिक गुन्हा शाखेेची खुर्ची नांदेडसाठीचा संघर्ष तारीख पे तारीख या पध्दतीने पुढे गेला आहे. या सर्व घटनाक्रमामध्ये दोन पोलीस निरिक्षकांची फजीती होत आहे. ज्यामध्ये आपले भोकर पोलीस ठाणे सोडून नांदेडच्या वजिराबादमध्ये नियुक्ती मिळालेले पोलीस निरिक्षक विकास पाटील हे सध्या स्टॅंडबाय आहेत. जगदीश भंडरवारांसाठी खुर्चीच रिकामी नाही म्हणून त्यांना तेथे जाता येत नाही. द्वारकादास चिखलीकरांची बदली नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली होती. पण त्यांनी स्टे घेतल्यामुळे श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांना कार्यमुक्त कोण करेल हा ही प्रश्न या सत्तासंघर्षात समोर आला आहे.
संबंधीत बातमी…
नांदेड स्थानिक गुन्हा शाखेच्या शर्यतीत कोण कोणाला ‘शह’ देणार ?; आज आहे सुनावणी