नांदेड(प्रतिनिधी)-22 वर्षीय राज प्रदीप सरपेच्या शरिरावर अनेक जखमा करून त्याचा खून केल्याप्रकरणी 9 युवकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या 9 मधील चार जणांची नावे सविता गायकवाड यांच्यावरील खोट्या जीवघेणा हल्ला प्रकरणात सामील आहेत. त्यातील तीन जणंाना अटक झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन दिलेला आहे आणि नवीन खून प्रकरणात त्या चौघांसह इतर पाच जणांची नावे समाविष्ट झाली आहेत. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 9 जणांपैकी बहुतेक सर्वच्या सर्वच पोलीसांच्या ताब्यात आहेत. पण अद्याप कायदेशीर अटक स्पष्ट झालेली नाही. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांच्या मार्गदर्शनात अत्यंत जलदगतीने काम करत स्थानिक गुन्हे शाखा आणि नांदेड ग्रामीण पोलीसांच्या पथकाने या मारेकऱ्यांना घटनेचे 24 तास पुर्ण होण्याअगोदरच आरोपींना गजाआड केले आहे.
25 फेबु्रवारी रोजी रात्री 8 ते 8.15 या दरम्यान वसंतराव नाईक कॉलेजच्या कमानीसमोर, सिडको येथे घर असलेल्या राज प्रदीप सरपे यांच्या घरी 9 जण आले आणि त्यातील लोकांनी केसरबाई प्रदीप सरपे (52) यांना विचारले की, तुझी दोन मुले कोठे लपवून ठेवलेली आहेत. 31 डिसेंबर 2022 रोजी सुध्दा असाच प्रकार घडला होता. तसेच 25 फेबु्रवारी 2023 रोजी त्याचा वचपा काढत राजू प्रदीप सरपे वर जिवघेणा हल्ला करून त्याचा खून करण्यात आला. या हल्यात राजूच्या शरिरावर अनेक ठिकाणी जखमा आहेत. एफआयआरमध्ये लिहिलेल्या शब्दानुसार त्याच्या मानेवर पिस्तुलातून गोळी झाडलेली आहे आणि शरिराच्या इतर भागांवर खंजीराने अनेक वार केलेले आहेत. केसरबाई सरपे यांनी तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा 26 फेबु्रवारी रोजी दुपारी 3.7 वाजता दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीत आरोपी या सदरात बाळ्या उर्फ विनोद मधुकर सावळे, किरण सुरेश मोरे, हर्षवर्धन सुभाष लोहकरे, कुंदन संजय लांडगे, अवधुत उर्फ लहुजी गंगाधर दासरवाड, विकास चंद्रकांत कांबळे, राजू उर्फ चिंधी महाजन धनकवार, गोपीनाथ बालाजी मुंगल, सुमित संजय गोडबोले यांची नावे आहेत. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 386, 120 (ब), 143, 147, 149, 323 सोबत भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 3/27, 4/25 आणि 4/27 त्यासोबत मुंबई पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा क्रमांक 122/2023 दाखल केला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक राजेश डाकेवाड हे करत आहेत.
संबंधीत बातमी…
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार; एकाचा मृत्यू