ताज्या बातम्या नांदेड

राष्ट्रप्रेम आणि जनकल्याणाच्या भावना प्रबळ करा-राज्यपाल रमेश बैस यांचे आवाहन

स्वारातीम विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी दीक्षान्त समारंभ थाटात संपन्न 

 नितीन गडकरी व कमलकिशोर कदम डी.लिट. पदवीने सन्मानित 

 गुणवत्ता पूर्ण शिक्षणातून समतेवर आधारित समाज आम्हाला निर्माण करायचा आहे. मानव कल्याण आणि आधुनिक शिक्षण यामध्ये समन्वय हवा. आपली भाषा, संस्कृती आणि सभ्यतेचा अभ्यास करताना इतर देशातील भाषा, संस्कृतीचा अभ्यास करा. नवीन शैक्षणिक धोरणाचा हेतू देशाला वैश्विक ज्ञान महाशक्ती बनविणे हा आहे. त्यासाठी राष्ट्रप्रेम आणि जनकल्याणाच्या भावना प्रबळ करा, असे आवाहन कुलपती तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री. रमेश बैस यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी दीक्षान्त समारंभात अध्यक्ष म्हणून आभासी प्रणाली द्वारे दीक्षान्त भाषण करतांना ते बोलत होते. यावेळी होमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे कुलपती, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष तथा अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर प्रमुख अतिथी म्हणून आभासी प्रणालीद्वारे  तर दीक्षान्त मंचावर भारत सरकारचे केंद्रीय मंत्री रस्ते व महामार्ग ना. नितीन गडकरी, राज्याचे माजी शिक्षण मंत्री  कमलकिशोर कदम, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, प्र- वित्त व लेखाधिकारी डॉ. श्रीकांत अंधारे,विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे,आंतरविद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. सुनंदा रोडगे, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. डी.एम. खंदारे, मानव्यविज्ञान विद्याशाखेचेसहयोगी अधिष्ठाता डॉ. विकास सुकाळे, सहसंचालक उच्च शिक्षण डॉ. रामकृष्ण धायगुडे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, डॉ. माधुरी देशपांडे, डॉ. महादेव गव्हाणे, डॉ. सुर्यकांत जोगदंड, डॉ. संतराम मुंढे, श्री. नरेंद्र चव्हाण, श्री. नारायण चौधरी, श्री. हनमंत कंधारकर, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर  म्हणाले , जागतिक स्पर्धेत पुढे येणे हे उद्दिष्ट जसे आपण साध्य करायला हवे, तसेच भारतात असलेली विषमता नष्ट करणे, यालाही प्राधान्य द्यायला हवे. दोन तृतीयांश लोकसंख्या अजूनही ग्रामीण भागात राहते. त्यामुळे शेतीबरोबरच इतर ज्ञानयुगाशी सुसंगत अशा नवीन संधी ग्रामीण भागात निर्माण व्हायला हव्यात. ग्रामीण भागात एक अशी इकोसिस्टीम निर्माण व्हावी की, ज्यामुळे स्थानिक ज्ञानाच्या आधारे अधिकाधिक मूल्यवृद्धी करता येऊ शकेल. मी या संकल्पनेला‘सिलेज’(बेस्ट ऑफ सिटी इन अ व्हिलेज’) या नावाने संबोधतो. सिलेजची म्हणजे ‘शहर आणि गावाला जोडणारा ज्ञानसेतू आहे, असे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, “माझ्यासारख्या सामान्य घरातील व्यक्तीला डी. लिट. मिळणे हा फार मोठा बहुमान आहे. याचे संपूर्ण श्रेय माझ्यावर  संस्कार करणाऱ्या आई-वडिलांचे,गुरुजनांचे आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला जाते. असे सांगून ते म्हणाले, “शैक्षणिक विकास हा सर्वांगीण विकासाचा पाया आहे. देशातील शेतकऱ्यांना सुखी, संपन्न, समृद्ध करण्यासाठी विद्यापीठे संशोधनद्वारे मार्ग काढू शकतात. नव्या काळात ही पारंपरिक पदव्यांचे व मानव्यशास्त्रांचे महत्त्व कायम राहणार आहे. इतिहास,पुरातत्त्वशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्य,भाषा-भाषाशास्त्र इत्यादींचे स्थान कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. या शाखांनी आणि त्यातील ज्ञानाने आपले जीवन सुंदर बनविले आहे. पण पोटाचे प्रश्न सुटले तरच माणूस जीवनासक्त आणि सौंदर्यासक्त होऊ शकतो. त्यामुळे रोजगाराभिमुख, उद्योगाभिमुख शिक्षणाची गंगा देखील आता प्रयत्नपूर्वक प्रवाहित करायला हवी. त्यासाठी सर्वंकष विकासाची व लोककल्याणाची चळवळ मराठवाड्याच्या  भूमीतून नव्याने सुरू व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम म्हणाले, शिक्षणाने माणसात बौध्दिक स्वावलंबन व आर्थिक स्वावलंबन निर्माण झाले पाहिजे. पण कमी दर्जाचे शिक्षण तरुणांना रोजगाराभिमुख बनवू शकत नाही. वेगाने बदलणाऱ्या आजच्या जगातील बदलांना सामावून घेणारी मानसिकता आजच्या तरुणांमध्ये कशी आणता येईल हे आपल्यापुढील आव्हान आहे.विद्यापीठाचा उद्देश ज्ञानाची निर्मिती आणि संवर्धन करून त्याचा उपयोग मानवी समाजाच्या विकासासाठी करणे हा आहे. कारण उज्ज्वल चारित्र्याचे तरुण हीच देशाची खरी संपत्ती असते. मानवाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी कितीही कष्ट घेतले तरी शांतीची शाश्वती नाही. बुद्ध आणि गांधीजीचा मार्ग हाच खरा शांतीचा मार्ग आहे. बुद्धाने सांगितले त्या प्रमाणे स्वतःचा प्रकाश होणे ही विकासाची सर्वोत्तम अवस्था आहे, असेही त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले म्हणाले आपल्याकडील जे सर्वोत्तम आहे याचा शोध घेवून त्याला जगाच्या प्लॅटफार्मवर आणण्याचा विद्यापीठाचा सतत प्रयत्न राहिला आहे. समाजाला उपयोगी पडणारे उच्च दर्जाचे संशोधन तसेच विद्यार्थ्यांना सर्वांगाने समृद्ध करण्यारे शिक्षण देवून समाजभान असणारा माणूस घडविणे यास विद्यापीठ प्राधान्य देत आहे. असे सांगून विविध क्षेत्रातील विद्यापीठाच्या कामगिरीचा अहवाल त्यांनी सादर केला.

प्रमुख अतिथींचे दीक्षान्त मिरवणुकीने कार्यक्रमस्थळी आगमन झाले. प्रारंभी पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेला चंदनहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते ना. नितीन गडकरी व कमलकिशोर कदम यांना मानद डी-लिट पदवी देवून सन्मानीत करण्यात आले. यावेळी डॉ पृथ्वीराज तौर व डॉ. केशव देशमुख यांनी मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. योगिनी सातारकर यांनी केले.

दुपारच्या सत्रामध्ये या दीक्षांत समारंभ मध्ये एकूण १७३विद्यार्थ्यांना पीएचडी प्रमाणपत्र देऊन पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. एकूण ५२ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. त्यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेंतर्गत नहीद खनुम नूरउल्लाह खान, प्रशांत दुरणाळे, प्रगतीटोम्पळे, सोनी मारवाडी, अनुष्का राठोरे, फिरदोस फतिमा मिर्झा खलील बैग, विवेक टाले,सुमित मामीडवार, शालिनी ढाले, सोनाली देवकते, स्पर्शिका मेटकर, मनीषा मठपती, शेख सीमरीन रौफ, प्रविण बिरादार,आरती मुळे, विकास सहानी,दिपिका ढगे, आकांक्षा पांडे,यशोदा दिवे या विद्यार्थ्यांचा सुवर्णपदके देवून गौरव कण्यात याला. मानव्यविज्ञानविद्याशाखेंतर्गत २० विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले त्यामध्ये साधना केंद्रे,वर्षा सुंदळे, सुकन्या सरोदे, प्रियंका देशपांडे,कुंता दुधाटे,तानाजीराव मिथुन, संगीताकोटे,ओमकार श्रीमंगले,श्रीराम देशपांडे, शुभांगी कांबळे,दिपक टिंगेलवार, मृनय जाधव,माधव शिंदे, शरमीन नाज शेख मौझुदीन, कोमल पोले यांना सुवर्णपदके देण्यात आले.वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेंतर्गत विद्या देशपांडे, रामदास वाघमारे, सुहानाशेख, अचल अग्रवाल यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. आंतरविद्याशाखेंतर्गत संदिपकेशवे, मोहन मेहत्रेया विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देण्यात आले आहे.

याप्रसंगी नांदेड खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर ,लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे, नायगावचे आमदार राजेश पवार, विधान परिषदेचे आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हा अधिकारी श्री. अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा पोलीस अधिक्षक कृष्णा कोकाटे, यांच्यासह संचालक, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *