स्वारातीम विद्यापिठाच्या 25 व्या दीक्षांत समारंभात राज्यपाल येणार
नांदेड(प्रतिनिधी)-स्वारातीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात यंदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री कमलकिशोर कदम यांना डिलिट देवून सन्मानीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस हे असणार आहेत अशी माहिती विद्यापिठाचे कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे आणि परिक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.दिगंबर नेटके यांनी दिली आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा 25 वा दीक्षांत समारंभ 24 फेबु्रवारी रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. या दीक्षांत समारंभात केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम यांना डिलिट ही मानद पदवी देवून सन्मानित करण्यात येणार आहे. या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षपद राज्याचे राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस हे भुषविणार आहेत. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून होमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे कुलपती, राजकीय गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष तथा अणुउर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ.अनिल काकोडकर यांची उपस्थिती असणार आहे.
हा 25 वा दीक्षांत समारंभ यशस्वीरित्या पार पडण्यासाठी कुलगुरू डॉ.उध्दव भोसले यांच्या मार्गदर्शनात विविध समित्यांचे गठण करण्यात आले आहे. 25 व्या दिक्षांत समारंभासाठी उपस्थिती व अनुउपस्थित राहुन पदवी घेण्यासाठी एकूण 18926 विद्यार्थ्यांनी आवेदन सादर केले आहे. विद्यापीठ परिनियमाप्रमाणे विद्यापीठ परिसर, परभणी उपपरिसर व हिंगोली येथील न्यु मॉडेल पदवी महाविद्यालयातील प्रवेशीत विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र दीक्षांत समारंभामध्ये विपरीत करण्यात येणार आहे. उर्वरीत पदवी प्रमाणपत्रे त्या-त्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येतील.
या दीक्षांत समारंभामध्ये एकूण 173 विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी देण्यात येणार आहे.52 विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक जिंकले आहे. त्यात विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील 23 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक देण्यात येणार आहे.मानव विज्ञान विद्या शाखेअंतर्गत 20 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेअंतर्गत 8 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक प्रदान करण्यात येणार आहे. अंतर विद्या शाखेअंतर्गत दोन विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक दिले जाणार आहे.
