नांदेड(प्रतिनिधी)-कुंटूर धान्य घोटाळ्यात वाहतुकीच्या कंत्राटामध्ये दबरदस्त उलथापालथ करून एक पारसेवार नामांकित झाले होते. आता दुसरे रमेश पारसेवार हे भुखंडावर बेकायदा ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात गुन्हेगारी जगातात आले आहेत. या प्रकरणात दोन जणांना अटक झालेली आहे. त्यात रमेश पारसेवार, कृष्णा शुक्ला आणि संग्राम राणे यांच्या अटकपुर्व जामीन अर्जावर 22 फेबु्रवारी रोजी सुनावणी होणार आहे.
कमल कुंदन पत्रावळी या मारोतराव बाबुराव नळगे यांच्या कन्या आहेत. मारोतराव नळगे अत्यंत ख्यातनाम व्यक्तीमत्व होते. ज्यांच्याबद्दल कै.मुख्यमंत्री विलासराव देशमुख व्यासपीठावरून त्यांचा उल्लेख अनेकदा करत होते. त्यांच्याकडे एमआयडीसी सिडको मध्ये सुध्दा अनेक भुखंड होते. दि.18 जानेवारी 2023 रोजी रात्री 8.30 वाजेच्यासुमारास गोदावरी ड्रग्स्च्या बाजूला असलेल्या 15,686 चौरस मिटरच्या एका भुखंडावर कब्जा मारण्यासाठी रामजतन बहादुर मंडल (58) रा.उस्माननगर रोड सिडको नांदेड, पांडूरंग बालाजी नळगे (36) रा.नंदीग्राम सोसायटी बळीरामपूर नांदेड, रमेश विश्र्वंभर पारसेवार आणि कमल पत्रावळीचेे भाऊजी अर्थात कमलच्या बहिणीचे पती संग्राम राणे यांच्यासह 10 ते 15 स्त्री आणि पुरूष येथे पोहचले. त्या ठिकाणी सुरू असलेल्या कामात त्यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. कमल पत्रावळीच्या शिवशक्ती फर्टिलायझरच्या गेटला तोडण्या प्रयत्न केला. बाहेरून सर्व मंडळी शिवीगाळ करत होती. याचा व्हिडीओ कमल पत्रावळी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असतांना एक जण गेटवरून उडी मारून आत आला आणि त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नांदेड ग्रामीणचे पोलीस सुध्दा तेथे आले. त्यांच्यासमोरही हा गोंधळ सुरूच होता. पण पोलीसांना पाहुन ही बेकायदा जमावाची मंडळी इकडे-तिकडे निघून गेली. घडलेल्या ठिकाणी पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोेरे आणि नांदेड ग्रामीणचे कर्दनकाळ पोलीस निरिक्षक अशोकरावजी घोरबांड साहेब यांनी 21 जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर 0.03 वाजता स्टेशन डायरी नोंद क्रमांक 8 प्रमाणे रवाना झाल्याची नोंद करून भेट दिली होती. 18 जानेवारीला घडलेल्या प्रकाराचा गुन्हा 21 जानेवारी रोजी मध्यरात्री स्टेशन डायरी नोंद क्रमांक 07 नुसार 02.37 वाजता दाखल झाला. या तक्रारीत फिर्यादीने आज येवून तक्रार दिली असे उशीराचे कारण लिहिलेले आहे. या प्रकरणाचा गुन्हा क्रमांक 34/2023 आहे. यामध्ये भारतीय दंड संहितेची कलमे 143, 146, 147, 149, 323, 327, 447, 109, 504 आणि 506 सोबत मुंबई पोलीस कायदा कलम 135 जोडले आहे. या गुन्ह्याचा तपास नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार यांच्याकडे देण्यात आला आहे.
या प्रकरणात पोलीसांनी 21 जानेवारी रोजी रामजतन बहादुर मंडल आणि पांडूरंग नळगे यांना अटक केली. त्यांना सुरूवातीला पोलीस कोठडी आणि नंतर न्यायलयीन कोठडी मिळाली. या प्रकरणातील इतर आरोपी रमेश विश्र्वंभर पारसेवार, संग्राम राणे आणि कृष्णा राजेंद्र शुक्ला यांनी नांदेडच्या जिल्हा न्यायालयात अटकपुर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल केला. यातील कृष्णा राजेंद्र शुक्ला हा गुन्हा घडल्यानंतर आपल्या पत्नी आणि दोन बालिकांसह नागपूरमार्गे गुजरातकडे जात असतांना रस्त्याची पुर्ण कल्पना नसल्याने रुईखोरी शिवारातील उड्डाणपुलावरून त्यांनी गाडी पुढे नेली. त्या पुलावरून आपला एक ते दीड किलो मिटरचा वळसा वाचविण्यासाठी एक मालवाहु टेम्पो चुकीच्या दिशेने आला आणि या दोन्ही वाहनांची धडक झाली. त्यात टॅम्पो चालक जागीच मरण पावला. कृष्णा शुक्ला आणि त्यांच्या पत्नी यांना गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या. मुलींना किरकोळ जखमा झाल्या आहेत.
रमेश पारसेवार आणि कृष्णा राजेंद्र शुक्लाला न्यायालयाने अंतरीम अटकपुर्व जामीन मंजुर केलेला आहे. या तीनही जणांच्या अटकपुर्व जामीन अर्जाची पुढील सुनावणी 22 फेबु्रवारी 2023 रोजी होणार आहे.प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार एमआयडीसीमधील वादग्रस्त भुखंडाबाबत एक सौदाचिठ्ठी कब्जा मारणाऱ्यांकडे आहे. परंतू एमआयडीसीच्या जागेची सौदाचिठ्ठी करताच येत नाही. तरीपण बेकायदेशीर कृत्य करून हा कब्जा मारण्याचा प्रयत्न झाला आहे. एक पारसेवार कृष्णूर धान्य घोटाळ्यामुळे गुन्हेगारी जगात आले होते.आता हे दुसरे पारसेवार ज्यांचे बरेच मोठे अनेक व्यवसाय आहेत ते आता बेकायदेशीरपणे भुखंड ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात गुन्हेगारी जगतात नामांकित झाले आहेत.
