आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडी
नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली शहरात हिरव्या रंगाच्या चार चाकी वाहनावर फायरींग झाली. यासंदर्भाने दाखल झालेला गुन्हा क्रमांक 19 मधील आरोपी शोधत स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने 6 पैकी चार आरोपी पकडून बिलोली पोलीसांच्या स्वाधीन केले. या चार जणांना बिलोलीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ठाणेदार यांनी 23 फेबु्रवारी 2023 पर्यंत असे पाच दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
रामतिर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी विभागीय रात्रगस्त करत असतांना संशय आलेल्या एका चार चाकी वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केल्यानंतर ती गाडी थांबली नाहीच उलट त्यांनी शासकीय गाड्या, बॅरीकेट यांना उडवून पळ काढला. गाडी पळ काढत होती आणि पोलीस पाठलाग करत होते. अखेर पोलीसांनी त्या गाडीला एका रस्त्यावर दोन्ही बाजूंनी घेरले. त्यावेळेस त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा मात्र संकेत दिघे यांनी त्या गाडीवर फायरींग केली.
या प्रकरणातील एकाला त्याच दिवशी बिलोली येथे पकडण्यात आले. या गुन्हा क्रमांक 19/2023 मध्ये भारतीय दंड संहितेची कलमे 399, 402, 307, 353, 279, 427 आणि भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 जोडली आहेत. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या आदेशाने पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार संजय केंद्रे, पद्मसिंह कांबळे, बालाजी यादगिरवाड, शेख कलीम यांनी या प्रकरणातील आरोपी मोहम्मद ताहेर मोहम्मद एकबाल (28) रा.मिल्लतनगर नांदेड, अब्दुल रौफ मोहम्मद उस्मान (35) रा.चुनाभट्टी देगलूर नाका नांदेड, कय्युम खॉ आयुब खॉ (27) रा.लतिफ पुरवा ता.नानपारा जि.बहराईज (उत्तरप्रदेश) ह.मु.मुुंब्रा मुंबई आणि फिरोज मुस्ताक अन्सारी (39) रा.अन्सारनगर भिवंडी मुंबई यांना पकडले.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे. या प्रकरणाचे तपासीक अंमलदार बिलोलीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रामदास केंद्रे हे आहेत. बिलोली पोलीसांनी फायरींग झाली तेंव्हा पकडलेला आरोपी न्यायालयाने 20 फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठविला आहे. स्थानिक गुन्हा शाखेने पकडलेले चार रामदास केंद्रे यांनी आज न्यायालयात हजर केले होते त्या चौघांना न्यायाधीश ठाणेदार यांनी 23 फेबु्रवारी 2023 पर्यंत, अर्थात पाच दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
