नांदेड(प्रतिनिधी)-मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार यंदाचे नांदेडचे प्राचार्य स.दी.महाजन यांना देण्यात यावा असे निर्णय आज मराठवाडा साहित्य परिषदेने घेतला.
मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कैवतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कार्यकारणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला परिषदेच्या विश्र्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकरराव मुळे, साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा.किरण सगर, कोषाध्यक्ष कुंडलिक अटकरे, कार्यवाह डॉ.दादा गोरे यांच्यासह डॉ.हेमलता पाटील, डॉ.संजीवनी तळेगावकर, उदगिरचे रामभाऊ पिरुके, नांदेडचे देविदास फुलारी, पैठणचे संतोष तांबे, परभणीचे मोहन कुलकर्णी, डॉ.सुरेश सावंत, विलास शिंदगिकर, डॉ.दिलीप बिरुटे आदी सदस्य उपस्थित होते.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या उभारणीत लक्षणीय कार्य केलेल्या साहित्यकार किंवा कार्यकर्त्यास, ज्यांच्या कार्याच्या गौरव म्हणून परिषदेच्यावतीने हा पुरस्कार दिला जात असतो. सन 2023 च्या पुरस्कारासाठी प्राचार्य स.दि.महाजन यांची कार्यकारणीने निवड केली आहे. महाजन हे 28 वर्ष मराठवाडा साहित्य परिषदेच्या विश्र्वस्त मंडळाचे सदस्य आणि अनेक वर्ष कार्यकारणीचे सदस्य तसेच काही वर्षे साहित्य मंडळाचे कोषाध्यक्ष होते. 1985 मध्ये नांदेड येथे झालेल्या 59 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष पद महाजन यांनी भुषवले होते. त्या संमेलनात त्यांनी अनेक नव्या प्रथा सुरू केल्या होत्या. शिवाय त्यांनी विश्र्वकोष निर्मिती मंडळ, महाराष्ट्र शासनाचे दर्शिका संपादक मंडळावर त्यांनी काम केले आहे. नांदेड येथील प्रतिभानितकेत महाविद्यालयाचे ते दिर्घकाळ प्राचार्य होते.
या पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम 25 हजार, शाल, श्रीफळ असे असते. प्राचार्य स.दि.महाजन यांना हा पुरस्कार त्यांच्या घरी जाऊन प्रदान करण्यात येणार आहे.
