नांदेड(प्रतिनिधी)-एका घरात घुसून दरोडा टाकणाऱ्या पाच जणांना 112 मदत मागणीच्या कॉलवर पोलीसांनी दिलेला प्रतिसाद आणि जनतेने केलेली मदत यामुळे दरोडा टाकणारे पाच आरोपी अत्यंत त्वरीत प्रभावाने जेरबंद करण्याची कार्यवाही करण्यात आली. जनतेने आपल्याकडे कामाला कोणी व्यक्ती ठेवतांना त्याचा फोटो आपल्या जवळ जरुर बाळगावा असे आवाहन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले.
पोलीस ठाणे विमानतळच्या हद्दीत वेदांतनगर भागात विकास शर्मा यांचे घर आहे. विकास शर्मा हे व्यावसायीक आहेत. त्यांच्या घरात आज फक्त पत्नी आणि एक छोटा मुलगा असे दोन लोक होते. सकाळी 10.30 वाजता कांही दरोडेखोर त्यांच्या घरात घुसले आणि काही जण घराबाहेर लक्ष ठेवून होते. पण राज्य शासनाने आणि पोलीस विभागाने जारी केलेली मदतीचा 112 हा क्रमांक त्या महिलेच्या लक्षात राहिला आणि तिने त्यावरून 112 ला कॉल केला. दरम्यान चोरट्यांनी त्या महिलेच्या अंगावरून सोन्याचे मनी मंगळसुत्र बळजबरीने काढून घेतले होते. सोबत अजून काही साहित्य चोरीला गेले. 112 क्रमांकावर काम करणारे पोलीस अंमलदार शिवराज गोणारकर आणि बोरकर यांनी त्वरीत प्रभावाने वेदांतनगर गाठले आणि त्या ठिकाणी जनतेने सुध्दा पोलीस विभागाला प्रतिसाद दिला आणि त्यांनी सुध्दा दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पोलीसांची मदत केली.
दरोडेखोरांचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. दरोड्यातील काही साहित्य ते सोबत घेवून गेले आहेत. दरोड्यातील प्रदीप स्वामी नावाचा एक फर्शी काम करणारा व्यक्ती अगोदर विकास शर्मा यांच्याकडे कामाला होता. नंतर काही बेबनाव झाल्याने त्याने हा दरोड्याचा बेत आकला. आपली मदत करण्यासाठी त्याने राजस्थानवरून काही दरोडेखोरांना बोलावले आणि त्यांनी हा सर्व प्रकार घडविला.
घटना घडली तेंव्हा त्या ठिकाणी दोन दरोडेखोर पोलीसांच्या ताब्यात आले आणि इतर लोकांना शोधण्यासाठी त्वरीतप्रभावाने पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराव धरणे, पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक अशोक अनंत्रे, सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार, पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके, पोलीस अंमलदार वाणी, मुंजाजी चावरे, खंडागळे, शरदचंद्र चावरे, मनोज परदेशी, रमेश सुर्यवंशी, बालाजी कदम यांनी मेहनत घेवून तीन जणांना पकडले.
पकडलेल्या पाच दरोडेखोरांची नावे प्रदीप शंकरलाल स्वामी (19), पवनकुमार रामूराम जाट(24), राजेंद्रकुमार सुरेशकुमार जाट(24), पंकज शंकरलाल स्वामी(21), मनिष नेमीचंद सेन (21) हे सर्व राजस्थानचे रहिवासी आहेत. दोन आरोपींच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहे. चोरट्यांनी टाकलेल्या दरोड्यातील मनीमंगळसुत्र आणि हत्यारे पोलीसांनी जप्त केली आहेत. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक विजयकुमार कांबळे अधिक तपास करीत आहेत. या दरोडेखोरांनी दरोडा टाकतांना तयार करावी लागणारी दहशत उभी राही म्हणून हत्यार खरेदी केले. हे हत्यार कोठून खरेदी केले याचीही माहिती आता पोलीसांकडे आहे. याचा अर्थ पोलीसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत कमी वेळेत आणि जलदगतीने पुढे आणून पोलीस काय करू शकतात हे दाखवून दिले.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी ही माहिती दिली तेंव्हा अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराव धरणे, पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, भाग्यनगरचे अशोक अनंत्रे आणि लिंबगावचे सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार यांची उपस्थिती होती.
आपल्या कामगारांचे फोटो सुरक्षीत ठेवा-श्रीकृष्ण कोकाटे
आज घडलेल्या या दरोडा प्रकरातून समोर आलेल्या माहितीनुसा आपल्या घरी, प्रतिष्ठाणांवर आपल्या कामासाठी आपण कामगार नेमतो. त्यांचा वावर आपल्या घरात सहज असतो. त्यामुळे त्यांना आपल्या घरातील सर्व माहिती मिळते. त्यातून काही बेबनाव घडल्यानंतर आजचा दरोडा प्रकार घडला आहे. आज जनतेचा प्रतिसाद आणि पोलीसांची जलद प्रतिक्रिया यामुळे अर्ध्या ते एक तासाच्या आत हा दरोड्याचा प्रकार पोलीसांनी हाणुन पाडला. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, आपल्याकडे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा एक फोटो आणि त्याचे शासकिय ओळखपत्र आपल्याकडे बाळगा ज्यामुळे आपल्याला भविष्यातील त्रासाठी पाहावे लागणारे दिवस थांबतील.