ताज्या बातम्या नांदेड

ज्येष्ठांप्रती आदराच्या भावनेसाठी प्रत्येक शालेय कार्यक्रमात ज्येष्ठांचा होईल सन्मान- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

नांदेड (जिमाका)- ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक सुरक्षिततेच्यादृष्टिने अनेक भावनिक कंगोरे पुढे येतांना आपण पाहतो. यात नवीन पिढी व त्या-त्या घरातील आजी-आजोबा यांचे नाते ही एक समृद्ध नात्याची ठेव आहे. कुटुंबातील आजी-आजोबांचे योगदान लक्षात घेता अंगणवाडी पासून शाळेपर्यंत आजी-आजोबांनाही विविध कार्यक्रमांना निमंत्रीत करून त्यांचा गौरव करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शिक्षण विभागाला दिले. अशा उपक्रमातून पाल्यांच्या मनातही ज्येष्ठांप्रती आदरयुक्त भावना वृद्धीस लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश डी. एम. जज, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे मराठवाडा प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष अशोक तेरकर, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर, ज्येष्ठ नागरिक कक्षाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एम. कलटवाड, जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार व संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
आपल्या कुटुंबातील पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती या अग्रही असतात. यादृष्टिने आपले कुठे योगदान जर आवश्यक असेल तशी संधीही ते तपासून पाहत असतात. घरातील लहान मुलांना शाळेसंदर्भात मदत करणे हा त्यांच्यासाठी आनंदाचा भाग असतो, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले.
*जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात दर बुधवारी दुपारी 12 ते 2 कालावधी ज्येष्ठांसाठी राखीव*
ज्येष्ठांच्या वैद्यकिय सेवा-सुविधांबाबत तात्काळ उपचार व्हावेत यादृष्टिने सर्व शासकीय रुग्णालयांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तथापि आठवड्यातील प्रत्येक बुधवारी दुपारी 12 ते 2 या कालावधी ज्येष्ठांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. या कालावधीत ज्येष्ठांच्या उपलब्ध असलेल्या सेवा-सुविधांनुसार सर्व तपासण्या केल्या जातील. विशेषत: ज्येष्ठांमध्ये फ्रोजन सोल्डर व इतर आजाराच्या तक्रारी असतात त्यासाठी उपलब्ध सुविधेनुसार परिपूर्ण सेवा देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले. अत्त्यावश्यकता भासेल यानुसार जिल्ह्यातील एमपीजीवाय अंतर्गत जेवढी रुग्णालय आहेत त्या सर्व रुग्णालयांना विशेष बाब म्हणून ज्येष्ठांना सवलत देण्याबाबत अशा रुग्णालयांना विनंती केली जाणार आहे.
*ज्येष्ठांच्या विरंगुळ्यासाठी लवकरच नाना-नानी पार्क येथील केंद्र होईल पूर्ववत*
ज्येष्ठांच्या मनोरंजनासाठी, करमणुकीसाठी मनपा व त्या-त्या नगरपरिषदांनी एक करमणुकीचे केंद्र विकसीत करावे अशी मागणी आहे. त्यादृष्टिने नाना-नानी पार्क येथे पूर्वीचे केंद्र पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी दिली. याचबरोबर चौफाळा, सिडको याठिकाणी शासनाच्यावतीने वेगळा निधी उपलब्ध करून घेण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
*ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात विशेष सेल*
ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षितता व कौटुंबिक अथवा इतर वादाच्या समुपदेशनासाठी स्वतंत्र सेल तयार करण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली कार्यान्वित केली आहे. त्यानुसार 112 या दूरध्वनी क्रमांकावर कोणत्याही गरजू नागरिक, महिला अथवा बालकांना केंव्हाही संपर्क साधून मदतीची मागणी करता येते. याच्या नियोजनासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याचबरोबर कोणत्याही पोलीस स्टेशनला मदतीसाठी केंव्हाही नागरिकांना जाता येईल. जिल्ह्यात या सेल मार्फत आज पर्यंत एकुण 39 अर्ज दाखल झाले. त्यापैकी 13 प्रकरणांत आपसी तडजोड करण्यात आली. पोलीस स्टेशनला 4 अर्ज वर्ग करण्यात आले. सहा प्रकरणात मा. न्यायालयात दाद मागवून समज पत्र देण्यात आले. वरील सर्व अर्ज सद्यस्थितीत निकाली काढण्यात आले आहे. पोलीस विभाग यासाठी दक्ष आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *