नांदेड(प्रतिनिधी)-ज्या पोलीस अंमलदारांच्या बदल्या झालेल्या आहेत. त्या सर्वांना बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्याचे आदेश सर्व प्रभारी अधिकारी पोलीस ठाणे, शाखा प्रमुख यांना देण्यात आले आहेत. यानंतर त्या पोलीस ठाण्याची पोलीस अंमलदार मंजुर संख्या रिक्त स्थानांची संख्या असे विवरण पत्र तयार करून 15 फेबु्रवारीपर्यंत पोलीस अधिक्षक कार्यालयात हजर करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिले आहेत.पण हे सर्व अत्यंत बिनचुक होईल काय? असा प्रश्न पोलीस दलातच उपस्थित होत आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सर्वसाधारण पोलीसांच्या बदल्या 2023 ची तयारी करतांना असे आदेश केले आहेत. त्यामुळे ज्या पोलीस अंमलदारांच्या बदल्या पोलीस ठाणे किंवा शाखांमधून इतरत्र झालेल्या आहेत. त्यांना त्या ठिकाणावरून कार्यमुक्त केल्यानंतर ते बदलीच्या ठिकाणी जातील आणि त्यानुसार खरी संख्या समोर येईल. त्यातून पुढील एक ते दोन महिन्यात होणाऱ्या पोलीसांच्या सर्वसाधरण बदल्यांना योग्य आकार देता येईल या बृहद उद्देशाने श्रीकृष्ण कोकाटे यांनी असे आदेश जारी केले आहेत.
पोलीस अधिक्षकांचा उद्देश अत्यंत चांगला असला तरी त्यांना केले जाणारे फिडबॅक महत्वाचे असते. आजही पोलीस अधिक्षक कार्यालयातील आणि विविध पोलीस ठाण्यांमधील अनेक ठिकाणी असे पोलीस अंमलदार कार्यरत आहेत ज्यांच्या बदल्या 2021 च्या सर्वसाधारण बदल्यांमध्ये झालेल्या आहेत. त्यानंतर सन 2022 च्या सर्वसाधारण बदल्या झाल्या तरीपण तसे पेालीस अंमलदार त्याच ठिकाणी कार्यरत आहेत. काही-काही महान व्यक्तीमत्वे जवळपास 8 ते 10 वर्षांपासून एकाच ठिकाणी आहेत. त्यांच्या बदल्या झालेल्या आहेत, त्यांची आस्थापना वेगळी आहे पण ते कार्यपुर्वीच्याच जागी करत आहेत. याही बाबींकडे पोलीस अधिक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे.
पोलीस विभागातील काही-काही ठिकाणी आमच्याशिवाय हा विभाग चालूच शकत नाही असा एक सुंदर समज पोलीस अंमलदारांमध्ये आहे. त्यामुळे त्या ठिकाणी येणारे प्रभारी अधिकारी आपल्याला आपला कार्यकाळ चांगला चालावा म्हणून त्यांची आवश्यकता त्या अधिकाऱ्यांनाही वाटते आणि पोलीस अंमलदार त्याच ठिकाणी ठेवून घेतला जातो. त्याची बदली झाली तरी त्याला सोडले जात नाही. सोडले गेलेच तर सलग्न आदेश काढले जातात आणि त्या आदेशाच्या अनुरूप तो पोलीस अंमलदार त्याच ठिकाणी काम करतो. काही -काही ठिकाणी तर पोलीस अंमलदाराची आस्थापना एका ठिकाणी असते पण त्या आस्थापनेच्या ऑर्डरबुकवर अमुक साहेबांच्या तोंडी आदेशाने तो पोलीस अंमलदार दुसऱ्या ठिकाणी कार्यरत असल्याचे लिहिले जाते. यामुळे काही पोलीस अंमलदारांसाठी बऱ्याच मोठ्या पोलीस अंमलदारांच्या संख्येवर होणारा हा अन्याय पोलीस अधिक्षकांनी पाहावा अशी चर्चा खुद्द पोलीस दलात होत आहे. कारण पोलीस अधिक्षक साहेबच आमचे माय-बाप असतात अशी भावना पोलीस अंमलदारांमध्ये आहे.
