… साहेब खरेच स्थानिक गुन्हा शाखेला माहिती नसतील काय हे जुगार अड्डे ?
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे नांदेडला आले आणि त्यांनी सुरूवातीच्या काळात कधीच रात्रभर बंद न राहणारे अनेक भाग बंद केले. जुगार अड्डे सुध्दा बंद केले. पण आता पुन्हा ते सर्व सुरू झाले आहे त्यातल्या-त्यात जुगार अड्ड्यांना तर बहर आला आहे. कोणी गुन्हेगार पोलीसांकडे निवेदन देतात तर त्याची चौकशी होत आहे आणि कोण्या वकीलांनी निवेदन दिले तर त्याचीच चौकशी होत आहे असा सुरू आहे कार्यकाळ नांदेड जिल्ह्याचा. पोलीस अधिक्षकांचे उजवे हात असणारी स्थानिक गुन्हे शाखा सुध्दा मुग गिळून गप्पच आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे नांदेडला आले आणि रात्रभर सुरू राहणारा पिरबुऱ्हाण हा भाग, रेल्वे स्थानक परिसर, बस स्थानक परिसर, देगलूर नाका हा सर्व असा परिसर आहे जो कधीच बंद होत नव्हता. पण श्रीकृष्ण कोकाटे यांनी या भागावर जरब बसवत सुरूवातीच्या कालखंडामध्ये हा सर्व प्रकार निर्मनुष्य केला. सर्वसामान्य जनतेला वाटत होते की, बरे झाले खुप दिवसांनंतर असे अधिकारी नांदेडला आले आहेत. सोबतच श्रीकृष्ण कोकाटे यांनी सर्व जुगार अड्डे बंद केले होते. त्याबाबीची सुध्दा प्रशंसा होत होती.मागे काही महिन्यांपुर्वी पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी असताना नांदेडच्या पोलीस पथकाने हिंगोली जिल्ह्यात जाऊन जुगार अड्ड्यांवर छापा टाकला होता. ती घटना भरपूर गाजली होती. त्यावेळी एक विदेशी चलन सारखे दिसणारे नोट सुध्दा तेंव्हा मिळाले होते म्हणे.
मात्र आजचा नवा कालखंड नव्या नऊ दिवसांसारखाच राहिला. श्रीकृष्ण कोकाटे यांनी जुगार अड्डे बंद केले होते. तेंव्हा त्यांना कोण दिली होती माहिती? पण बंद झाले होते हे मात्र सत्यच होते. पण आता पुन्हा एकदा जुगार अड्ड्यांना बहर आला आहे. गुन्हेगार या संज्ञेत नाव असणाऱ्या एकाने अर्ज दिला तर त्याबाबतची चौकशी नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेतून सुरू झाली. कालच वकील आणि युवक कॉंगे्रस दक्षीण विधानसभाचे ऍड.प्रेसनजित वाघमारे यांनी पोलीस अधिक्षकांना एक निवेदन दिले. त्यात त्यांनी नांदेड शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट कोठे आहे, पत्यांचे क्लब, मटका, सट्टेबाजी, मोठे प्रमाणात फोफावली आहे असे लिहिले आहे. त्यांनी वाजेगाव परिसरात शफी बिल्डर, लक्ष्मण पाटील, मॅफको परिसरात सागर यादव आणि बाबा तसेच हिम्मतपुर भागात आसिफ, खालेद चाऊस, रहेमान पठाण तसेच एमजीआर भागात अर्शद, यासीन हे व्यक्ती जुगार अड्डे चालवतात असे लिहिले आहे. माझ्या निवेदनावर कार्यवाही झाली नाही तर 10 फेबु्रवारीपासून धरणे आंदोलन करेल अशी विनंती सुध्दा ऍड.प्रसेनजित वाघमारे यांनी केली आहे. या अर्जाच्या प्रति त्यांनी जिल्हाधिकारी नांदेड आणि पोलीस विभागीय अधिकारी इतवारा यांना दिल्या आहेत असे या निवेदनावरून दिसते.
ऍड.प्रसेनजित वाघमारे यांनी नांदेडचाच उल्लेख केला पण तेलंगणा राज्याच्या सिमेवर असलेले धर्माबाद, यवतमाळ जिल्ह्याच्या सिमेवर असलेले हदगाव, मोठ-मोठे नेते मंडळी राहतात अशा शिवाजीनगर भागात, इतवारा, नांदेड ग्रामीण, लिंबगाव अशा सर्व जागी जुगार अड्ड्यांना बहर आलेला आहे हा कसा आला याची पाहणी करणे सुध्दा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचीच जबाबदारी आहे. साहेब आपल्याला कर्दनकाळ म्हणून ओळखले जायला हवे. पाहा आपल्या पोलीस दलातील कोणी सुर्याजी पिसाळ आहेत, कोण मिर सादेक आहेत हे शोधा म्हणजे आम्हाला लिहिण्याची गरज राहणार नाही. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर हे तर आता रेकॉर्डब्रेक कालखंड पुर्ण करण्याच्या मार्गावर आहेत मग खरच त्यांना माहिती नसेल काय की कोठे-कोठे चालतात जुगार अड्डे? काय गरज आहे कोणाला जुगार अड्ड्यांची निवेदने देण्याची, पोलीस विभागाकडून ही अपेक्षा करायची नाही तर मग जनतेने ही अपेक्षा कोणाकडून करायची. काही पोलीस अधिकारी फाटक्या नेत्यांना आपल्या हाताशी धरुन काय-काय करून घेताता हे पण आपल्यालाच तपासायचे आहे. आपल्या नातलगांनाच काहीनी वसुली अधिकारी केले आहे त्याचीही माहिती घ्या. आपले नाव श्रीकृष्ण आहे त्या नावाला आपण नक्कीच न्याय द्याल अशी नांदेडकरांची अपेक्षा आहे.