खऱ्या आणि खोट्या नोटा मिळून 1 कोटी 14 लाखांची कागदे जप्त
नांदेड(प्रतिनिधी)-10 लाख खऱ्या नोटांच्या बदल्यात तीनपट रक्कम मिळणार या खोट्या आमिषापोटी हिंगोली जिल्ह्यात 1 फेबु्रवारीच्या रात्री घडलेल्या प्रकारानंतर त्यात एकूण 1 कोटी 14 लाख रुपयांच्या खोट्या नोट्या आणि 9 फसवणुक करणारे गुन्हेगार औंढा पोलीसांनी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना औंढा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गोसावी यांनी 3 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.1 फेबु्रवारी रोजी रात्री औंढा ते हिंगोली जाणाऱ्या रस्त्यावर औंढा गावाच्या बाहेर काही लोकांमध्ये झुंज होत असल्याची माहिती औंढा पोलीसांना मिळाल्यानंतर औंढा पोलीसांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना त्यांना ताब्यात घेतले. समोर आलेल्या प्रकरणानुसार मुजफर नजीर शेख रा.हिनानगर चिखलठाणा आणि एक महिला नांदेडला आले. त्यांनी सोबत 12 लाख 50 हजार रुपयांच्या खऱ्या नोटा आणल्या होत्या. त्याबद्दल त्यांना 33 लाख रुपयांच्या खोट्या नोटा मिळणार होत्या. या प्रकरणात ही देवाण-घेवाण झाली आणि नंतर झालेल्या भांडणात हे ठकसेन पोलीसांच्या हाती लागले. घडलेला प्रकार औंढाचे पोलीस निरिक्षक विश्र्वनाथ झुंजारे यांनी पोलीस अधिक्षकांना सांगितला. हिंगोलीचे पोलीस अधिक्षक जी.श्रीधर यांनी पळून गेलेल्या लोकांचा तांत्रिक दृष्टीकोणातून मोबाईल लोकेशन प्राप्त करून खामगाव येथील पोलीसांना त्याची माहिती दिली. खामगाव येथील पोलीस उपअधिक्षक कोळी यांनी हिंगोली पोलीसांनी सांगितलेल्या वाहनाला ताब्यात घेतले. त्या वाहनात त्यांना 75 लाख रुपयांच्या खोट्या नोटा आणि 1 लाख 92 हजारांच्या खऱ्या नोटा जप्त केल्या.इकडे हिंगोली पोलीसांनी 33 लाखांच्या खोट्या नोटा पकडल्या. याप्रमाणे या सर्व खऱ्या आणि खोट्या नोटांची किंमत 1 कोटी 14 लाख रुपये होते. या खोट्या नोटांवर भारतीय वजो बॅंक असे लिहिले असून त्या नोटांचा दर प्रत्येकी 500 रुपये आहे. खोट्या नोटा घेण्याच्या नादात घेणाऱ्यांनी याची तपासणी कशी केली नाही हा प्रश्न पडतो. नोटांच्या प्रत्येक बंडलमध्ये वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला शेवटी एक-एक खरी नोट आणि इतर 58 खोट्या नोटा जोडून ते बंडल तयार केले होते.
हिंगोली पोलीसांनी पकडलेल्या आणि खामगाव पोलीसांनी पकडलेल्या लोकांची नावे विनोद शिवाजीराव शिंदे, सोमनाथ बापूराव दापके, सुनिल नरहरी जंगवाड तिघे रा.लातूर, केशव विश्र्वनाथ वाघमारे, विलास पंढरीनाथ वडजे, गुणाजी गवणाजी मुधळे तिघे रा.नांदेड, ज्ञानप्रकाश परमेश्र्वर जांगीड, राहुल चंद्रसिंग ठाकूर आणि लखन गोपाल बजाज हे तिघे रा.खामगाव असे आहेत. यात अजूनही दोन लोक फरार आहेत. मुजफर नजीर शेख यांच्या तक्रारीवरुन औंढा पोलीसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 489 आणि 120(ब) नुसार गुन्हा क्रमांक 29/2023 दाखल केला आहे.
हे सर्व खोट्या नोटांचे प्रकरण हाताळतांना पोलीस अधिक्षक जी.श्रीधर, पोलीस उपअधिक्षक वाखारे, पोलीस निरिक्षक विश्र्वनाथ झुंजारे, पोलीस उपनिरिक्षक गणेश राठोड, प्रकाश आडे, पोलीस अंमलदार अफसर पठाण, संदीप टाक, माधव सुर्यवंशी, विलास पाईकराव, ज्ञानेश्र्वर गोरे, रमेश गायकवाड, विनायक सुपेकर, वसीम पठाण, हनुमान बेले, सचिन मस्के, विश्र्वनाथ मुकाडे, राहुल मोगली यांनी भरपूर परिश्रम घेतले.
आज 3 फेबु्रवारी रोजी पोलीस निरिक्षक विश्र्वनाथ झुंजारे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी पकडलेल्या 9 जणांना औंढा न्यायालयात हजर करून या गुन्ह्याच्या तपासाची व्याप्ती आणि अजून जवळपास 10 लाख रुपये खऱ्या नोटा जप्त करण्याची गरज न्यायालयासमक्ष मांडली.युक्तीवाद ऐकून न्यायाधीश —- गोसावी यांनी 9 जणांना 3 दिवस अर्थात 7 फेबु्रवारी 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
औंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला हा प्रकार पहिलाच नाही या अगोदर सुध्दा राज्यभर, नांदेड जिल्ह्यात असे अनेक प्रकार घडलेले आहेत.नांदेड जिल्ह्यात तर कांही पोलीसांची नावे सुध्दा अशी ठकबाजी करण्यामध्ये मागे आली होती. खोट्या नोटा मिळवून करणार काय? हा प्रश्न सुध्दा तेवढाच महत्वपूर्ण आहे. आज मजहर नजीर शेखला आणि त्या महिलेला खोट्या नोटा का हव्या होत्या. म्हणजे खोटे चलन बाजारात पसरविण्याची त्यांची सुध्दा इच्छा आहे काय? या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही.कोण देत हो तीन पट पैसे. प्रसार माध्यमे प्रत्येक वेळेस जनतेला आवाहन करतात की, अशा बनावट प्रकरणांमध्ये जावू नका, स्वत:ची फसवणूक करून घेवू नका तरीपण असे अनेक प्रकार घडतात आणि लोकांची फसवणूक होतच राहते.या पुढे तरी जनतेने सत्यता पाहावी आणि बनावट नोटा घेवून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करू नये अशी विनंती वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा करत आहे.