नांदेड(प्रतिनिधी)- काही फाटक्या राजकीय नेत्यांनी अर्ज करून पैसे कमावण्याचा एक नवीन धंदा सुरू केला आहे. अर्वाचिन काळापासून सुध्दा अवैध धंदे सुरू होते ते आजही सुरूच आहेत. जगाची निर्मिती करणारा ब्रम्हदेव आला तरी अवैध धंदे बंद होणार नाहीत. भारताच्या स्वातंत्र्यानंतर काही दिवस देश आपला आहे ही भावना प्रत्येकामध्ये होती. पण हळूहळू ही भावना लोप होत गेली आणि मी, माझे कुटूंब , माझी गल्ली, माझे गाव, माझा जिल्हा, माझे राज्य आणि देशाचा क्रमांक सर्वात शेवटी गेला.
कालपर्यंत मोंढ्यामध्ये उभे राहुन सिडको-हडको अशी ओरड करून प्रवाशांना ऍटोमध्ये बसवणारे काही फाटके नेते झाले. अवैध धंद्यांमध्ये सुध्दा प्रतिद्वंद आहे आणि या द्वंदातून एकाकडून सुपारी घेतली जाते आणि दुसऱ्या विरुध्द अर्ज केला जातो. त्यात काही पोलीस मंडळी सुध्दा सहभागी होतात. नुसतेच सहभागी होत नाहीत तर अर्ज सुध्दा लिहुन देतात. अशाच प्रकारचे धंदे सध्या सुरू झाले आहेत.
दोन-चार दिवसांपुर्वीच नदी पलिकडच्या पोलीसांनी दोन 52 पत्यांचे जुगार अड्डे सुरू करण्याची परवानगी दिले आहे म्हणे. हे धंदे अत्यंत जोमात चालावे म्हणून इतर अवैध धंदेवाल्यांची सुपारी घेण्याचा धंदा एका फाटक्या नेत्याने केला. कोणी बिल्डर नावाच्या माणसाने त्या फाटक्या नेत्याला काही जणांविरुध्द अर्ज करायला लावला आणि त्या फाटक्या नेत्याने दिलेल्या अर्जानंतर सुरू झाली चौकशीची फेरी म्हणजे. एकीकडचा तराजूमधला भाग काढून आपल्या वाट्यात टाकण्याचा हा धंदा सुरू करण्यासाठी त्या फाटक्या नेत्याला काही रक्कम दिली गेली आणि दररोज काही रक्कम मिळणार असे आश्र्वासन दिले.
कालपरवाच पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आपल्या काही अधिकाऱ्यांचा चांगली कामगिरी करण्यासाठी सन्मान केला. नांदेड जिल्ह्यात श्रीकृष्ण कोकाटे यांचीच तुतारी बोलली पाहिजे. त्या तुतारीला हवा देण्याचे काम अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी करायला हवे अशीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. पण काही पोलीस अधिकाऱ्यांना अशा फाटक्या नेत्यांकडून आपली हप्ता वसुली सहज करता येते, कोणतीही रिस्क नसते म्हणून अशा फाटक्या नेत्यांची सध्याच्या युगात झालेली चलती सुध्दा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी थांबवावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कारण या सर्व प्रकारांमुळे बदनामी तर मात्र फक्त पोलीस विभागाचीच होत आहे. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे येतात जिल्हाभरात सर्वच जुगार अड्डे बंद करण्यात आले होते. पण आठ दिवसातच पुन्हा ते सुरू झाले.वास्तव न्युज लाईव्हला प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर लिहिलेल्या या जुगार अड्ड्यांच्या व्यतिरिक्त जिल्ह्यात किती जुगार अड्डे असतील याचा सुध्दा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनीच घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.