नांदेड(प्रतिनिधी)-जोमेगाव जाणाऱ्या रस्त्यावरील धनज (बु) फाट्याजवळ 31 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता काही दरोडेखोरांनी 54 हजार 429 रुपयांची ऐवजाची लुट केली आहे. तसेच इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश दालमिल कम्पाऊंडमध्ये एक घर फोडून चोरट्यांनी 39 हजारांचा ऐवज चोरला आहे.
प्रविण आनंदराव चाकोरे हे क्रेडीट एक्सीस फायनान्स ग्रामीण लि. शाखा नायगाव येथे कार्यरत आहेत. ते 31 जानेवारी रोजी धनज (बु) फाट्याजवळून जोमेगावकडे जात असतांना रात्री 11 वाजेच्यासुमारास दोन अज्ञात चोरटे त्यांच्या पाठीमागून आले आणि त्यांना तलवारीचा धाक दाखवून त्यांच्याकडील बॅग लुटली. या बॅगमध्ये फायनान्स कंपनीच्या ग्राहकांकडून वसुल केलेले 46 हजार 429 रुपये, 8 हजार रुपये किंमतीचा टॅब घेवून ते दरोडेखोर पळून गेले. उस्माननगर पोलीसांनी हा गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम 392 प्रमाणे दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक केंद्रे अधिक तपास करीत आहेत.
आनंद ओमप्रकाश सारडा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 जानेवारी रोजी सकाळी 6 ते 7 या वेळेदरम्यान त्यांच्या गणेश दालमिल कम्पाऊंड परिसरातील घरात कोणी तरी चोरट्यांनी कुलूप तोडून प्रवेश केला आणि त्यांच्या आईच्या कक्षातील कपाटत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिणे व रोख रक्कम असा 39 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. इतवारा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके यांच्याकडे हा तपास देण्यात आला आहे.
