ताज्या बातम्या

तृणधान्याच्या महत्त्वासाठी जिल्हा परिषदेत भाकरी-ठेचातून बचतगटांच्या महिलांनी दिला संदेश

▪️आहारातील तृणधान्यातून सुदृढ आरोग्यासाठी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीमार्फत विशेष मोहिम- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

नांदेड (प्रतिनिधी) – इथल्या मातीच्या गुणधर्मानुसार व पर्यावरणातील विविधतेनुसार मानवी शरीराला पोषक मूल्य देणारे अनेक तृणधान्य निसर्गाने देऊ केलेले आहेत. अनेक पिढ्यांपासून आपण ज्वारी, बाजरी, भगर, नाचणी, राजगीरा ही तृणधान्य खात आलो आहोत. आपल्या पूर्वीच्या पिढ्यांनी याच आहारावर आपले आरोग्य उत्तम ठेवले. अलिकडच्या काही वर्षात आपला आहार शरीराला न मानवणाऱ्या गहू, तांदूळ, डाळी यांच्या वरेमाप वापरावर केंद्रीत केल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. आपल्या मूळ सत्वाकडे तृणधान्याच्या आहारातून पोषक सात्विकतेचा संदेश गावोगावी पोहचावा या उद्देशाने तृणधान्य आहार चळवळीला बचतगटाच्या माध्यमातून व्यापक स्वरुप देता आले, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकरी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

 

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद व माविमच्यावतीने जिल्हा परिषद आवारात तृणधान्याचे महत्त्व व्यापक व्हावे यासाठी ज्वारी, नाचणीच्या ताज्या भाकरी व ठेचा, हुरडा स्टॉलच्या माध्यमातून प्रातिनिधीक स्वरुपात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. लहान व अर्धापूर येथील बचतगटाच्या महिलांनी जिल्हा परिषदेच्या आवारात नियोजीत ठिकाणी नाचणी व ज्वारीच्या चुलीवरील भाकरी, चटणी, ठेचा, हुरडा याची अपूर्व प्रातिनिधीक स्वरुपात मेजवानी दिली.

 

जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पंचायत समिती, अंगणवाडी सेविका व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तृणधान्याचे आहारातील महत्त्व यावर संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित केले. जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीमध्ये हा महोत्सव घेण्यात येऊन फास्टफूडकडे सरकत जाणाऱ्या आपल्या आहाराला आरोग्यवर्धक पोषक आशा स्लोफूड अर्थात तृणधान्याकडे वळविण्याचा हा प्रयत्न असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *