नांदेड(प्रतिनिधी)-बीएएमएसच्या अंतिम वर्षात शिक्षण घेऊन पुढच्यावर्षी डॉक्टर पदवी प्राप्त करण्याच्या अगदी जवळ असणाऱ्या युवतीचा खून करून पुरावा नष्ट करणारे तिचे वडील, काका, भाऊ, मामा आणि एक चुलत भाऊ अशा पाच जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भिनी ईंबिसात देशमुख यांनी सहा दिवस अर्थात 3 फेबु्रवारी 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
नांदेडपासून जवळ असलेल्या पिंपरी (महिपाल) या गावी 22 जानेवारी रोजी रात्री आपल्या 22 वर्षीय युवतीला गळा दाबून तिचे वडील जनार्धन लिंबाजी जोगदंड (48), भाऊ कृष्णा जनार्दन जोगदंड(19), काका गिरधारी शेषेराव जोगदंड(30), चुलत भाऊ गोविंद केशवराव जोगदंड (32) आणि मामा केशव शिवाजी कदम (37) अशा पाच जणांनी आपल्याच घरात गळात दाबून तिचा खून केला. तिचे प्रेत पोत्यात बांधून आपल्याच शेतात नेले आणि तेथे तिला अग्नी दिला. 23 जानेवारी रोजी त्या जळालेल्या युवतीच्या प्रेताची राख पोत्यात बांधून पाण्यात वाहुन टाकली.
लिंबगावचे सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार यांना त्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरिक्षक कोंडीबा केजगिर, पोलीस अंमलदार अशोक दामोधर, पिल्लेवाड आणि चालक सोनकांबळे यांना पिंपरी गावी पाठविले. त्या ठिकाणी असणारे पोलीस पाटील आणि इतर गावकऱ्यांशी चर्चा करून ही माहिती प्राप्त झाली की, हा प्रकार घरच्या लोकांनी ऑनर किलींग प्रकारात घडविला आहे. पोलीसांनी कोंडीबा केजगिर यांच्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 15/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 201, 120 (ब), 34 नुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार यांच्याकडे देण्यात आला.
पोलीसांनी युवतीचे मारेकरी तिचे वडील, भाऊ, काका, मामा, आणि चुलत भाऊ अशा पाच जणांना 27 जानेवारी रोजी सकाळी 5 वाजता अटक केली. आज दुपारी सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार त्यांचे सहकारी पोलीस सुनिल सुर्यवंशी, सोबेकर, प्रमोद मोरे, प्रकाश पेद्देवाड, मुंजाजी चवरे, बाळासाहेब कळकेकर, विवेक रावते, दत्ता शिंदे, निवृत्ती रामनबैनवाड, महिला पोलीस अंमलदार एस.बी.जाधव यांनी पकडलेल्या पाच जणांना न्यायालयात हजर केले. या आरोपींच्या गुन्ह्याची संपुर्ण हकीकत बाहेर काढण्यासाठी पोलीस कोठडीतील तपासाची अत्यंत गरज असल्याचा मुद्दा सरकारी वकील ऍड. वाघमारे यांनी मांडला. त्यांचा मुद्दा लक्षात घेत न्यायाधीश देशमुख यांनी ऑनर किलींगमधून युवतीचा खून करणाऱ्या पाच जणांना सहा दिवस अर्थात 3 फेबु्रवारी 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी…
पिंपरी महिपाल येथे युवतीची ‘ऑनर किलिंग’;वडील,भाऊसह 5 जण गजाआड