ताज्या बातम्या नांदेड

दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात विश्वास जागवावा- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

▪️पुर्वतयारी आढावा बैठकीत कॉपीमुक्त परीक्षेवर अधिक भर   

नांदेड (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी शाळा तेथे परीक्षा केंद्र याबाबीखाली किमान 15 विद्यार्थी असलेल्या प्रत्येक शाळांना परीक्षा उपकेंद्र देण्यात आले होते. यावर्षी मंडळाने पूर्वीच्याच मुळ परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्याचे निश्चित केले असून परीक्षा विहित वेळेप्रमाणे व शंभर टक्के अभ्यासक्रमावर घेतल्या जाणार आहेत. यात विद्यार्थ्यांचा पूर्वी प्रमाणेच आत्मविश्वास वाढावा व त्यांना आनंदाने भयमुक्त वातावरणात परीक्षा देता याव्यात यासाठी शिक्षकांनी विशेष लक्ष देऊन कॉपी मुक्त परीक्षेसाठी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात पार पडावी यादृष्टिने पूर्व तयारी आढावा बैठक आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्राचार्य जयश्री आठवले, उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, बंडू आमदूरकर, विस्तार अधिकारी पोकळे आदी उपस्थित होते.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दिनांक 2 मार्च पासून सुरू होत आहेत. यासाठी अनुक्रमे 92 व 160 परीक्षा केंद्र याचबरोबर केंद्र संचालक नेमण्यात आले असून तेवढेच बैठे पथक नेमण्यात येत आहेत. बारावीच्या परीक्षेला जिल्ह्यातून 39 हजार 645 तर दहावीच्या परीक्षेला 45 हजार 468 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यासाठी परिक्षकही नेमण्यात आलेले आहेत.

कॉपीमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षा देता यावी यासाठी सर्व संबंधीत परीक्षा केंद्र संचालकांनी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. सीसीटीव्ही सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्या-त्या परीक्षा केंद्रावर व्हायला हवा. परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर आल्यावर अधिक आश्वासक वातावरण देण्याचा त्या-त्या परीक्षा केंद्राने प्रयत्न केला पाहिजे, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. कोविडच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना अभ्यास करतांना अधिक सोपा कसा होईल, लहान प्रश्न व त्याचे उत्तरे लक्षात कशी ठेवता येऊ शकतील याबाबत मार्गदर्शनावर शिक्षकांनी भर द्यावा. विद्यार्थी तणाव मुक्त कसे होतील यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केली.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *