

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर एका 38 वर्षीय युवकाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून घेतले. त्या युवकाच्या आरोपाप्रमाणे तो ग्राम पंचायत कार्यालय सेवक पदाच्या उमेदवारीसाठी पात्र असतांना त्याला डावळण्यात आले. आरोप खरा की खोटा याबद्दल काही सत्यता आज सांगता येत नाही. पण या युवकावर आत्महत्येचा प्रयत्न या सदराखाली वजिराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका महिन्यात जिल्हा परिषदेच्या कार्यालयात आत्महत्येचा हा दुसरा प्रयत्न आहे.
सुगाव खुर्द ता.नांदेड येथील ग्राम पंचायत कार्यालयात सेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या युवकांमध्ये शेख हुसेन शेख शादुल्ला (वय 38) याचे नाव होते. पण त्याची निवड झाली नाही. त्याच्या आरोपाप्रमाणे तो या पदासाठी पात्र होता. आज दि.19 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेच्यासुमारास शेख हुसेन हा युवक थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षासमोर पोहचला. कोणाला काही कळण्या अगोदरच त्याने आपल्या हातातील पेट्रोल भरून आणलेल्या बॉटलीतील पेट्रोल आपल्या अंगावर शिंपडले पण त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षक पोलीसांनी त्याला काडी लावून घेण्याअगोदर ताब्यात घेतले. वजिराबाद येथील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेख हुसेन शेख शादुल्ला या युवकास ताब्यात घेतले. पोलीस अंमलदार विवेक रावते यांच्या तक्रारीवरुन शेख हुसेन शेख शादुल्ला विरुध्द वजिराबाद पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न करणे या सदराखाली भारतीय दंड संहितेच्या कलम 309 प्रमाणे दाखल करण्यात आला असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. या गुन्ह्याचा क्रमांक मात्र वास्तव न्युज लाईव्हला प्राप्त झाला नाही.
या पुर्वी 23 डिसेंबर रोजी सुध्दा गोपाल सोनटक्के आणि भगवान कंधारे या दोन जणांनी ज्वलनशिल पदार्थ आपल्या अंगावर टाकून याच ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ती घटना लंपी रोगाच्या पार्श्र्वभूमीवर पशुधन पर्यवेक्षक संवर्गाकरीता कंत्राटी कर्मचारी नेमण्याबाबतची प्रक्रिया होती. जिल्हा परिषद कार्यालयात एका महिन्यात दोन आत्महत्या करण्याचे प्रयत्न अशा घटना घडल्या आहेत.