नांदेड(प्रतिनिधी)-भोकर शहरात राहणारे दिगंबरराव बिंदु स्मारक समिती तथा महाविद्यालयाचे सचिव यांचे घर फोडून चोरट्यांनी 3 लाख 10 हजारांचा किंमती ऐवज चोरुन नेला आहे.
भोकरच्या सईदनगर, देशमुख कॉलनी भागात दिगंबरराव बिंदु महाविद्यालयाचे सचिव शेख मुरादमियॉं मांजरमकर हे राहतात. त्यांच्या दुसऱ्या एका घरात त्यांचा मुलगा शेख बशिर हा वास्तव्यास आहे. शेख बशिर आणि त्यांची पत्नी हे 16 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजेच्यासुमारास सईदनगर येथून त्यांच्या भावाच्या आजारी मुलीस भेटण्यासाठी सहकुटूंब नांदेड येथे आले होते. आजारी मुलीला भेटून ते परत भोकरला आले आणि आपल्या जुन्या घरी मुक्काम केला. 17 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजेच्यासुमारास शेख बशीर मांजरमकर आणि त्यांच्या पत्नी आपल्या घरी पोहचल्या तेंव्हा त्यांचे घर फोडलेले होते. तपासणी केली असता घरातून 1 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम आणि 1 लाख 60 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरट्यांनी पळवले होते.
घटनेची माहिती मिळताच भोकरचे अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराव धरणे, पोलीस निरिक्षक विकास पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. भोकर पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 23/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 457, 380 नुसार दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक अनिल कांबळे याबद्दल अधिक तपास करीत आहेत.
