ताज्या बातम्या विशेष

जिअरस्वामी मठ श्री.बालाजी मंदिर गाडीपुराचा कारभार आता नवीन महंतांकडे

सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयात उद्या होणार सुनावणी
नांदेड(प्रतिनिधी)-जिअरस्वामी मठ संस्थान श्री.बालाजी मंदिर गाडीपुरा येथे सहधर्मदाय आयुक्त औरंगाबाद यांनी दिलेल्या आदेशानंतर मागील 9 विश्र्वस्तांना बेदखल करण्यात आले.पुढील कारभार सहधर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरिक्षक आणि अर्जदार सुरजसिंह तुलजारामसिंह माला यांच्या हातात देण्यात आला. खूनाची प्राथमिकी ज्याच्याविरुध्द सन 2011 मध्ये रद्द करण्यात आली त्यातील एका व्यक्तीला बालाजी मंदिराचे महंत करण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या दि.12 जानेवारी 2023 रोजी सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय नांदेड येथे होणार आहे. करोडो रुपयांची संपत्ती असलेल्या या संस्थानाची मागील 23 वर्षात झालेली वाताहत आता तरी सुधारेल काय? असा प्रश्न या नवीन बदलाने समोर आला आहे.
नांदेड येथील जिअरस्वामी मठ संस्थान सन्माननिय महंत श्री.लक्ष्मणाचार्यजी गिर यांनी स्थापन केले आहे. त्यावेळी महंत एकच विश्र्वस्त या संस्थानचे होते. गाडीपुरा भागातील सर्व ज्येष्ठ राजपुत बांधवांनी महंत श्री.स्वामी लक्ष्मणाचार्यजी यांना भरपूर मदत करून या मठाचा कारभार चालवला. पुढे महंतांनी व्यंकटेश दलसिंगार दुबे आणि त्याचा भाऊ प्रदीप दलसिंगार दुबे या दोघांना 1980 च्या दशकात नांदेडला आणले. काही कारणांनी मग या दोन्ही दुबे बंधूंची रवानगी नांदेडवरून करुन देण्यात आली. त्यातील व्यंकटेश यांची नियुक्ती बारड येथील मंदिरात करण्यात आली. जिअरस्वामी संस्थानचे नांदेड जिल्ह्यातील बारड, जालना, ऋषीकेश, तिरुपती येथे सुध्दा मंदिरे आहेत. नांदेड येथे पावडेवाडी भागात गट क्रमांक 138 मध्ये 8 हेक्टर 62 आर आणि गट क्रमांक 139 मध्ये 8 हेक्अर 21 आर अशी शेत जमीन पण आहे. सोबतच गाडीपुरा भागात मोठी जागा असून त्या जागेमध्ये जवळपास 20 भाडेकरू आहेत. त्यात 26 खोल्या आहेत. व्यंकटेश यांना बारडला पाठविल्यानंतर श्री. स्वामी लक्ष्मणाचार्यजी यांनी महंतपदावर स्वामी केशवाचार्य यांची नियुक्ती केली. सन्माननिय श्री.स्वामी लक्ष्मणाचार्यजी यांच्या मृत्यूनंतर केशवाचार्य गुरू श्री.लक्ष्मणाचार्यजी हेच संस्थानची देखभाल करत होते.
सन 1995 मध्ये दिवाणी दावा क्रमांक 192/95 मध्ये एक तडजोड झाली.ज्यात केशवाचार्य आणि व्यंकटेश यांच्यामध्ये ती तडजोड अशी झाली की, केशवाचार्यांच्या मृत्यूनंतर व्यंकटेशाचार्य जिअर संस्थानचे महंत बनतील. गाडीपुरा भागातील सर्व वरिष्ठ राजपुत व्यक्तींच्या मेहनतीने जिअरस्वामी संस्थान नावारुपाला आले. अत्यंत मोठ-मोठे कार्यक्रम येथे होत होते. तडजोडीची घटना झाल्यानंतर 6 नोव्हेंबर 1999 रोजी तत्कालीन महंत केशवाचार्य हे पावडेवाडी येथे संस्थानच्या शेतीकडे गेले असतांना परत येत असतांना त्यांच्या कारवर हल्ला झाला आणि गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आला होता. या दिवशी महंत पदाची जागा रिकामी ठेवता येत नाही म्हणून सचिदानंद ललन मिश्रा उर्फ स्वामी सच्चिदानंद गुरू केशवाचार्य यांची नियुक्ती महंत पदावर समाजाने केली होती.सच्चिदानंद ललन मिश्रा हे पहिले महंत श्री.लक्ष्मणाचार्यजी यांच्या काळात श्री.बालाजी मंदिरात पुजारी होते. नंतर त्यांना केशवाचार्य महंत पदावर आल्यानंतर सच्चिदानंद मिश्रा यांना जालना येथील नरनारायण मंदिरात पाठविण्यात आले होते.
महंत केशवाचार्य यांच्या खूनानंतर त्याबाबत भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 276/1999 भारतीय दंड संहितेच्या कलम 302 सह इतर कलमान्वये दाखल झाला. या गुन्ह्यात पोलीस तपासात असे निष्पन्न झाले होते की, कौशल उर्फ शैलेंद्र उर्फ रामदास कृष्णकुमार शुक्ला आणि बिरपालसिंह उर्फ हरी रामप्रसाद बारी दोघे रा.गोरखपुर उत्तरप्रदेश यांनी आपला एक साथीदार केवट याच्या साथीने केशवाचार्य यांचा खून केला होता. या खुन करण्याची सुपारी व्यंकटेश दलसिंगार दुबे आणि त्यांचे भाऊ प्रदीप दुबे यांनी दिली होती. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा शाखेने केला होता. तत्कालीन अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील आरोपींना शोधण्यासाठी उत्तर भारत ते दक्षीण भारत असे अनेक प्रवास केले आणि कौशल शुक्ला आणि बिरपालसिंह बारी या दोघांना अटक झाली. नांदेड जिल्हा न्यायालयाने या दोघांना जन्मठेप आणि रोख दंड अशी शिक्षा ठोठावली होती. त्या दोषारोपपत्रात अनेकांची नावे फरार आरोपी या सदरात होती.
उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे व्यंकटेशाचार्य गुरू लक्ष्मणाचार्य उर्फ व्यंकटेश दलसिंगार दुबे आणि प्रदीप दलसिंगार दुबे यांनी त्या दोघांविरुध्द गुन्हा क्रमांक 276/1999 रद्द करावा अशी मागणी केली. त्या अपीलचा क्रमांक 2801 असा होता. 25 मार्च 2011 रोजी या दोघांविरुध्दचा एफआयआर रद्द झाला होता. जिअरस्वामी मठ ताब्यात मिळावा म्हणून व्यंकटेश दलसिंगार दुबे नेहमीच प्रयत्नशिल होते आणि वेगवेगळ्या कायदेशीर बाबींचा आधार घेवून आपले काम त्यांनी सुरूच ठेवले होते. त्यावेळी अनेकांनी व्यंकटेशाचार्य यांना विरोधही केला होता. काही जणांनी त्यांची पाठराखणही केली होती. सन 2012 मध्ये सुध्दा जिअरस्वामी मठ ताब्यात घेण्यासाठी एक प्रयत्न झाला होता.
या सर्व प्रकरणांच्या घाईगडबडीत स्वामी श्री.लक्ष्मणाचार्यजी यांच्या काळातील त्यांचे सहकारी आणि मंदिराचे भक्त सुरजसिंह तुलजारामसिंह माला यांनी सहधर्मदाय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे अर्ज क्रमांक 7/2014 दाखल केला. या अर्जात मंदिराचे विश्र्वस्त पुजारी सच्चिदानंद ललन मिश्रा, सुरजप्रसाद काशीप्रसाद यादव, डॉ.रामरतनसिंह उमरावसिंह बिसेन, लड्डूसिंघ हरीसिंघ महाजन, नरेंद्रपाल जसवंतपाल बरारा, दादाराव बाबराव ढोणे, बनारसिदास रामजीलाल अग्रवाल, नंदकिशोर गोविंदनारायण सोमानी, रमेशसिंह मानसिंह तेहरा या 9 जणांविरुध्द ही मंडळी मंदिराची संपत्ती हडप करत आहे. त्यांना काढून टाकावे अशी मागणी केली. या अर्ज क्रमांक 7/2014 चा निकाल 9 डिसेंबर 2022 रोजी आला. त्यात सहधर्मदाय आयुक्त एस.जे.बियाणी यांनी या विश्र्वस्तांना पाच वर्षासाठी किंवा नवीन विश्र्वस्तांची नेमणूक होईपर्यंत या पैकी जी घटना अगोदर घडेल तो पर्यंत हे 9 सदस्य निलंबित करण्यात आले आहेत. त्यानंतर सुरजसिंह माला व इतरांनी या पिठाच्या महंत या गादीवर स्वामी व्यंकटेशाचार्य गुरू श्री.स्वामी लक्ष्मणाचार्यजी यांची नियुक्ती केली आणि जुने महंत सच्चिदानंद शास्त्री यांना बेदखल केले.
हा घटनाक्रम पोलीस ठाणे इतवारापर्यंत पोहचला 2 जानेवारी 2023 रोजी सुरजसिंह माला यांनी पोलीस ठाणे इतवारा येथे अर्ज दिला की, जुने महंत सच्चिदानंद शास्त्री आणि त्याचा मुलगा चंदन हे नव नियुक्त महंत स्वामी व्यंकटेशाचार्य यांना मानसिक त्रास देत आहेत. त्यांना पुजा आर्चा करू देत नाहीत आणि या दोघांपासून त्यांच्या जीवला धोका आहे. या अर्जावर इतवाराचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, इतवाराचे पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांनी त्वरीत दखल घेतली. श्री.बालाजी मंदिरात पोलीस गार्ड नियुक्त केला. सोबतच प्रतिबंधात्मक कार्यवाही केली आणि फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 149 प्रमाणे दोघांना नोटीस दिली आहे. या प्रकरणाचे चौकशी अधिकारी पोलीस उपनिरिक्षक सय्यद मुनीर यांनी सांगितले की, याबाबत आम्ही सहाय्यक धर्मदाय आयुक्तांना विचारणा केली तेंव्हा त्यांनी पोलीसांना सांगितले आहे की, याप्रकरणातील निलंबित केलेल्या 9 प्रतिवादींना आम्ही नोटीस पाठवली आहे. त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी 12 जानेवारी 2023 ही तारीख सुनिश्चित केलेली आहे. त्यांचे म्हणणे आल्यावर याप्रकरणाचा पुढील निर्णय होईल.
एकंदरीत जिअरस्वामी मठसंस्थान श्री.बालाजी मंदिर गाडीपुरा या ठिकाणी मागील 20 वर्षापेक्षा जास्त काळापासून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा नव्या रुपाने समोर आला आहे. कायद्याच्या काही प्रकरणांमध्ये व्यंकटेश दलसिंगार दुबे असणारे आज या मंदिरात महंत पदावर स्वामी व्यंकटेशाचार्य गुरू श्री.स्वामी लक्ष्मणाचार्यजी झाले आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *