नांदेड(प्रतिनिधी)-शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या एका लघुलेखकाला त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या युनोऍप लिंकवर बॅंकेची माहिती भरल्यानंतर दहा मिनिटात त्यांच्या खात्यातून 5 लाख 89 हजार 777 रुपये काढून घेण्यात आले आहेत. भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, कोणत्याही लिंकला अशा प्रकारे प्रतिसाद देवू नका त्याबद्दल संपूर्ण खात्री झाल्यानंतर त्यातील माहिती भरा जेणेकरून सायबर क्राईमपासून आपला बचाव होईल.
गोपाळकृष्णनगर येथे राहणारे सेवानिवृत्त लघुलेखक विनायक गोपाळराव फुटाणे यांना 9 जानेवारी रोजी सायंकाळी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर युनोऍप ही बॅंकेची लिंक आली. त्यात अर्ज भरल्याप्रमाणे आपला युजर आयडी, पासवर्ड, मोबाईल क्रमांक, एटीएम क्रमांक, सीव्हीसी क्रमांक सर्व काही भरून पाठवले. त्यानंतर लगेच दहा मिनिटात त्यांच्या बॅंक खात्यातून 1 लाख 50 हजार, 99 हजार 999, 24 हजार 999, 2 लाख 14 हजार 780, 99 हजार 999 असे एकूण 5 लाख 89 हजार 777 रुपये गायब झाले. विनायक फुटाणे हे काही दिवसांपुर्वीच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या बॅंक खात्यात जवळपास 14 लाख रुपये रक्कम होती. त्यातील 5 लाख 89 हजार 777 रुपये आता ठकसेनांच्या खात्यात गेले आहेत. भाग्यनगर पोलीसांनी या तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक 11/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि तंत्रज्ञान कायदा कलम 66(डी) प्रमाणे दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक सुधाकर आडे हे करीत आहेत.
चुकीच्या आवाहनाला बळी पडू नका
भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांनी या गुन्ह्याच्या संदर्भाने जनतेला आवाहन केले आहे की, अशा प्रकारे कोणतीही लिंक आली तर त्यावर आपले सविस्तर विवरण भरून नका. अगोदर त्या लिंकची माहिती घ्या, खात्री पटल्यानंतरच त्या लिंकवर माहिती भरा. सोबतच कोणतेही कॉल आले तर, ते बॅंकेचे कॉल नसतात त्यावर विचारलेली माहिती सुध्दा देवू नका जेणे करून सायबर क्राईमपासून आपला बचाव होईल. कोणतीही माहिती समजली नाही तर पोलीस विभागाशी संपर्क साधावा आणि त्यानंतर पुढे काम करा.
