नांदेड(प्रतिनिधी)- 70 वर्षीय महिलेच्या शरिराला वाईट दृष्टीकोणातून हात का लावलास अशी विचारणा करणाऱ्याचा खून करणाऱ्या 52 वर्षीय मारेकऱ्याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश श.ए.बांगर यांनी जन्मठेप आणि 11 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
मौजे कोठारी (चि) ता.किनवट येथील दिगंबर रामराव नरवाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मालकाच्या शेतात 24 नोव्हेंबर 2018 रोजी कापुस वेचणीचे काम सुरू होते. कापुस वेचणी झाल्यावर कापसाचे गठ्ठे मालकाच्या घरी पाठविण्यात आले. दिगंबर हे आखाड्यावरच राहत होते. त्या दिवशी तुनतुना वाजवणारा पांडे नावाचा व्यक्ती तेथे आला आणि एक भिक्षा मागुन जगणारी 70 वर्षीय महिला आली. त्यांनी तेथे आखाड्यावर मासाहारी जेवण तयार करणे सुरू केले आणि काही वेळाने मी घरी गेलो. त्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी सकाळी आलो असतांना आखाड्यावर धोंडीबा ज्योतीराम पिलवण (65) या माणसाचा मृतदेह पडलेला होता. तक्रारीमध्ये तीन जणांची नावे आरोपी म्हणून होती. त्याची एक मानसिक रुग्ण होता. या तक्रारीवरुन किनवट पोलीसांनी गुन्हा क्रमांक 291/2018 भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 34 नुसार दाखल केला.
या प्रकरणातील एका 60 वर्षीय महिलेचे म्हणणे धक्कादायक आहे. ती महिला देवकरीण असल्याने भिक्षा मागुन जगते ती त्या दिवशी शिवराम पांडे आणि तिच्या शब्दातील एक पिस(वेड) आणि डफडेवाला असे नरवडे यांच्या मालकाच्या शेतातील आखाड्यावर आले. त्या ठिकाणी सर्वांनी मासाहारी जेवणाचा बेत बनवला आणि ही जबाबदारी धोंडीबा पिलवन यांच्यावर आली. महिलेच्या सांगण्याप्रमाणे दरम्यान सर्वांनी दारु प्राशन केली. त्यावेळी शिवराम पांडे हा माझ्या शरिराशी लगट करू लागला तेंव्हा मटन बनवणारे धोंडीबा पिलवन यांनी शिवराम पांडेला तशी लगट न करण्यासाठी सुनावले आणि आपल्याकडील काठीने त्यास मारहाण केली. त्यानंतर मात्र शिवराम उर्फ नारायण देवराव पांडे यांने धोंडीबा पिलवनला त्याच्याच काठीने मारहाण केली आणि धोंडीबा खाली पडले तेंव्हा इतर जण पळून गेले. किनवट पोलीसांनी या महिलेचा जबाब व्हिडीओ चित्रीकरणाद्वारे अभिलेखात आणला होता.
सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.डी.कांबळे यांनी या प्रकरणाचा तपास करून शिवराम उर्फ नारायण देवराव पांडे (52) रा.वडगाव ता.पुसद जि.यवतमाळ तसेच लक्ष्मण गंगाधर मुरमुरे (62), राजू लक्ष्मण मुरमुरे (22) दोघे रा. पवना ता.हिमातयनगर अशा तिघांविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले. यावर न्यायालयात सत्र खटला क्रमांक 220/2022 प्रमाणे न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. न्यायालयात याप्रकरणी एकूण 11 साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालया समक्ष नोंदवले. न्यायालयासमक्ष आलेला पुरावा आणि युक्तीवाद या आधारावर तीन आरोपीं पैकी शिवराम उर्फ नारायण देवराव पांडे यास जन्मठेप आणि 11 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावण्याचे आदेश न्या.श.ए.बांगर यांनी दिली. इतर दोघांची सुटका झाली. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी बाजू मांडली. तर पैरवी अधिकाऱ्याची भुमिका सहाय्यक पोलीस निरिक्षक वाठोरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार भगवान महाजन आणि एस.ए.ढेंबरे यांनी पुर्ण केली.
