नांदेड(प्रतिनिधी)-7 जानेवारीच्या मध्यरात्री वेळेस दोन गटात किल्ला रोड परिसरात भांडण झाल्यानंतर इतवारा पोलीसांनी त्यातील काही जणांना ताब्यात घेतले आहे.
दि.7 जानेवारी रोजी मध्यरात्री किल्ला रोड परिसरात किल्याच्या अगदी जवळ दोन गटांमध्ये हणामारी झाली. त्यावेळी वेगवेगळ्या चर्चा झाल्या पण 8 जानेवारी रोजी पोलीसांनी काही जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर राधेशाम उर्फ बजरंग अंकुशराव कुंडगिर याने दिलेल्या तक्रारीवरुन चेतन चंद्रभान गवळी रा.किल्ला रोड आणि अक्षय परिवाले रा.होळी यांच्याविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 324, 323, 504, 506 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 10/2023 दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके यांच्याकडे देण्यात आला.या प्रकरणातील आरोपी चेतन गवळी विरुध्द इतवारा पोलीस ठाण्यात चार जुगार कायद्याचे गुन्हे दाखल आहेत आणि लवकरच चेतन गवळी विरुध्द हद्दपारीचा प्रस्ताव सुध्दा पाठविला जाणार आहे. यातील दुसरा आरोपी अटक करायचा बाकी आहे.
याच प्रकरणात चेतन चंद्रभान गवळी याच्या अर्जावरुन राधेशाम उर्फ बजरंग अंकुशराव कुंडगिर (27) रा.मुरमुरागल्ली आणि त्याचा मित्र डड्डा उर्फ शाहरुख रा.आयना महल टेकडी या दोघांविरुध्द गुन्हा क्रमांक 11/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 324, 323, 504, 506, 34 नुसार दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी राधेशाम उर्फ बजरंग कुंडगिर विरुध्द वजिराबाद, इतवारा, लिंबगाव, नांदेड ग्रामीण, भाग्यनगर, विमानतळ, शिवाजीनगर या ठिकाणी एकूण वेगवेगळे 11 गुन्हे दाखल आहेत. या आरोपीविरुध्द सुध्दा एमपीडीए कायद्याअंतर्गत प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक सय्यद मुनिर यांच्याकडे देण्यात येणार आहे.
