नांदेड,(प्रतिनिधी)- पोलीस विभागाचे नाव ऐकताच आणि त्यातील व्यक्तिमत्व पाहत असताना प्रत्येकाचा थरकाप उडतो. परंतु या पोलिसांच्या खाकी वर्दी मध्ये सुद्धा माणसेच असतात हे पाहताना आपल्या सामाजिक जबाबदारीची आठवण आपल्याला सुद्धा यायला हवी.असाच एक प्रकार काल सायंकाळी घडला पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांच्या दोन सहकारी पोलिस अंमलदारांनी 60 वर्षीय महिलेचे प्राण वाचवले, त्या महिलेला दिलेले जीवदान ही सामाजिक जबाबदारी आहे. पोलिसांना सुद्धा सामाजिक जबाबदारी पार पाडावी लागते हे दाखवणारा हा प्रसंग प्रत्येकाच्या मनाला हेलकावे घालणारा आहे.
काल दिनांक 7 जानेवारी रोजी सायंकाळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण आगलावे हे वजीराबाद पोलीस ठाण्यात आपले रोजचे कामकाज करत असताना त्यांना मिळालेल्या माहितीनुसार ते पळतच गोदावरी नदी परिसरात आले. त्या ठिकाणी एक महिला अत्यंत विष्षण अवस्थेत बसलेली होती.
त्यांना विचारणा केली असता त्यांनी घरातील कलाहामुळे आपण जीव देण्याचा विचार करत आहोत, आपला देह गोदावरीच्या समर्पित करण्यासाठी आलो आहोत असे सांगितले. हकीकत ऐकताच पोलीस उपनिरीक्षक प्रवीण आगलावे, पोलिस अंमलदार मनोज राठोड आणि संतोष आर्लूवाड यांच्या अंगावर शहारे उभे राहिले. त्यानंतर पोलिसांनी त्या महिला सुलोचना (काल्पनिक नाव) यांना आपल्या सोबत वजीराबाद पोलीस ठाण्यात आणले.आईला मुलींची माया जास्त लवकर स्थिर करेल म्हणून प्रविण आगलावे यांनी आपल्या पत्नी आणि लेकरांना सुद्धा पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. पोलिसांनी सांगितले की आम्ही तुमचे कुटुंबीय आहोत.काय गरज आहे ती सर्व आम्हाला सांगा आम्ही ती पूर्ण करू पूर्ण करू. घडलेला प्रकार आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून प्रवीण आगलावे यांनी जयया महिलेचे पती आणि मुलांना बोलावून त्यांच्या घरी पाठवले सोबतच स्वतःचा मोबाईल नंबर दिला कोणत्याही अडीअडचणीमध्ये आपण मला बोलावू शकता मी कोणत्याही क्षणाची वेळ न लावता आपल्या सेवेत हजर राहील असे अभिवचन प्रवीण आगलावे आणि त्यांच्या पत्नी दोघांनी दिले.
घडलेला प्रकार धक्कादायक आहे ज्या आई-वडिलांनी मुलांना जन्म दिला. त्यांना कर्तृत्ववान बनवले. त्यांच्यावतीने आपल्या आईबद्दल न दिसणारे प्रेम या घटनेतून पुढे आले. वाढत्या वयासोबत प्रत्येक माणसाची वृत्ती ही लहान 2 ते 7 वर्ष वयाच्या बालकांसारखी होते. आपण सर्व बालकांचे हक्क पुरवतोच ना, पण आपल्या आई-वडिलांचे हट्ट पुरवण्या मध्ये व्यक्तींमध्ये झालेली कमतरता अशा प्रकारच्या घटना समोर आणत आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा जसे जसे वय वाढते त्या वयानंतर त्यांना देखभालीची गरज असते. अनेक वेळेस वैद्यकीय खर्च असतो, सोबतच येणाऱ्या जाणाऱ्या पाहुणेमंडळींसोबतची चर्चा ही महत्त्वपूर्ण असते आणि अशा परिस्थितीत त्यांना प्रतिसाद मिळाला नाही तर त्यांच्या मनातील भावना अश्या होतात. तेव्हा वृद्ध व्यक्ती अशाच पद्धतीने आपल्या प्राणांची आहुती देण्याच्या मार्गाला लागतो. परंतु ज्यांच्यामुळे त्या व्यक्तीला मृत्यू आला किंबहुना मृत्यू स्वीकारावा लागला त्यांना या सर्व घटना आजच्या नंतर तरी लक्षात ठेवण्याची गरज आहे.
पोलीस उपनिरीक्षक प्रवीण आगलावे यांनी हा पहिलाच प्रकार केला नाही तर यापूर्वीसुद्धा त्यांनी अनेक लोकांना अशा प्रकारे मृत्यू कडे जाण्यापासून परावृत्त केलेले आहे. वरिष्ठ अधिकारी सुद्धा त्यांच्या या कामाची दखल घेत असतात. आजही घेतील. पण समाजात राहणारे व्यक्ती म्हणून आम्हाला सुद्धा प्रवीण आगलावे यांनी केलेल्या कामाची दखल घेणे अत्यंत आवश्यक आहे .नसता आम्ही आमच्या लेखणी सोबत बेईमानी केली असा त्याचा अर्थ होईल. पोलीस हा विचार करताना आपल्याला नेहमीच नको रे बाबा असे वाटते. पण खाकी वर्दीतल्या या माणसाने दाखवलेली माणुसकी आम्हाला आमच्या जीवनात आणता येईल का याचा विचार करण्याची गरज आहे.