नांदेड(प्रतिनिधी)-नैसर्गिक वर्ग वाढ करण्याचे अधिकार नसतांना नांदेड जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.सविता सिध्दगौंडा बिरगे यांनी अक्षम्य चुक केली याबाबत शिक्षण संचालक सुरज मांढरे यांच्या आदेशानंतर सविता बिरगे यांच्याविरुध्द फसवणूक या सदराखाली गुन्हा दाखल झाला आहे.
श्री.साई शिक्षण संस्था लोणी (बु) ता.अर्धापूर जि.नांदेड संचलित आदर्श प्राथमिक विद्यालय अर्धापूर येथे सन 2022 मध्ये नैसर्गिक वर्ग वाढ देण्याची संचिका कार्यालयात मिळून आली नाही म्हणजेच ती गहाळ झाली आहे. या आदर्श शिक्षण संस्थेला 5 ते 7 व्या वर्गात नैसर्गिक वर्गवाढ विनाअनुदानित तत्वावर मान्य करण्यात आली आहे. आज संचिका गायब असली तरी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना नैसर्गिक वर्ग वाढ देण्याचे अधिकारच नाहीत. या नंतर सुध्दा संचिका मिळाली तरी नैसर्गिक वर्ग वाढीची मान्यता घेण्यासाठी तो प्रस्ताव शासनाकडे पाठवावा लागतो आणि सध्या तरी तसे करण्यात आलेले नाही. या सर्व बाबींचा अभ्यास करून भारतीय प्रशासनिक सेवेतील अधिकारी आणि शिक्षण आयुक्त पुणे सुरज मांढरे यांनी प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे येथील अधिक्षक दिपक पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगेविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार शिक्षण आयुक्तालयातील अधिक्षक दिपक अर्जुन पाटील यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, 28 डिसेंबर 2016 रोजी ही नैसर्गिक वर्गवाढीची संचिका कार्यालयात मिळाली नाही अर्थात ती गहाळ झाली. याबाबत झालेल्या चौकशीनुसार हा सर्व घोळ शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगे यांनी केला आहे. त्यानुसार वजिराबाद पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420 नुसार गुन्हा क्रमांक 7/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्याकडे देण्यात आला आहे. वृत्तलिहिपर्यंततरी नांदेड जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.सविता सिध्दगौंडा बिरगे यांना अटक झाली नाही अशी माहिती पोलीस विभागाकडून मिळाली आहे.
