नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या जीवनाच्या कालखंडात आपल्याला मिळालेले काम हे आपल्या आवडीचे असावे किंवा मिळालेल्या कामात आपली आवड निर्माण करावी अशी सुंदर जगण्याची पध्दत आहे. अशाच विचारश्रेणीतून कंधार तालुक्यातील पातळगंगा येथील रहिवासी वैद्यकीय अधिक्षक डॉ.अशोक मुंडे यांनी स्वेच्छा निवृत्ती स्विकारली असून आता पुढील कालखंडात ते आपल्या धर्मपत्नीसोबत रुग्ण सेवा करणार आहेत.
भोकर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अशोक मुंडे यांना 30 डिसेंबर 2022 रोजी त्यांच्या अर्जानुसार स्वेच्छा निवृत्ती देण्यात आली. कंधार तालुक्यातील पातळगंगा गावात जन्मलेले डॉ.अशोक धोंडीबा मुंडे यांनी आपल्या शासकीय सेवेत रुग्णांना भरपूर सेवा दिली. विशेषत: कोरोना काळात आपल्या जीव धोक्यात घालून रुग्ण सेवा केली. ती सेवा आजही अनेकांच्या स्मरणार्थ आहे.
त्यांच्या पत्नी डॉ.मनिषा मुंडे या पुजा हॉस्पिटल चालवतात. त्यांच्या दोन मुली आहेत. त्यातील एक अनुष्का या सध्या मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. दुसरी मुलगी रेणु आहे. स्वेच्छा निवृत्ती स्विकारून डॉ.अशोक मुंडे यांनी आपल्या पत्नी डॉ.मनिषा यांच्यासोबत रुग्णसेवा करण्याचे ठरविले आहे. रुग्णांपासून जास्तीत जास्त पैसे काढण्यापेक्षा त्यांना जास्तीत जास्त सेवा कमीत कमी खर्चात कशी देता येईल यासाठी मुंडे पती-पत्नी विख्यात आहेत. त्यांनी घेतलेल्या या निर्णयासाठी त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना भविष्याच्या कामासाठी शुभकामना दिल्या आहेत.
