ताज्या बातम्या विशेष

रस्ते अपघातातील अधिकांश प्रमाण हे आपल्या बेजबाबदार वर्तणाचेच प्रतीक- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर 

▪️वाहतुक नियमांच्या साक्षरतेसाठी विधी सेवा प्राधिकरणाने रस्त्यावर उतरून केले आवाहन 

नांदेड (प्रतिनिधी)- इतरांप्रती आदराची भावना ही सदैव चांगल्या वर्तणाची दिशादर्शक असते. इतरांना दुखवू न देता नम्रतेच्या भावनेत जर आपण स्वत:ला ठेवले तर कोणत्याही कायद्याची पायमल्ली होण्याचा प्रश्न उरत नाही. तथापि न कळत सातत्याने होणारे कायद्याचे उल्लंघन हा जर आपल्या वर्तणाचा भाग बनला तर त्याची किंमत ही जीवघेणी ठरू शकते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. विशेषत: रस्ते अपघात हे आपल्या गैर व बेपर्वा वर्तवणुकीचे द्योतक असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर यांनी केले.

 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त आयोजित साक्षरता उपक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा येथे वाहतुकीच्या नियमाबाबत पत्रके वाटून वाहतुक साक्षरता अभियानाचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर-जज, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप निमसे, वाहतुक शाखा पोलीस निरीक्षक श्री. ननवरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी विना हेल्मेट दुचाकी वाहन चालविणाऱ्या व्यक्तींना प्रातिनिधीक स्वरूपात पत्रक देऊन हेल्मेट वापरण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर यांनी केले. याचबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. हे अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत असून यातील पहिला टप्पा 6 जानेवारी रोजी भव्य रॅलीने पूर्ण केला जाणार आहे. रस्त्यावरील अपघातात पादचारीही बळी पडतात. हे निष्पाप बळी रोखण्यासाठी रस्त्याच्या उजव्या बाजुने चला हे अभियान जाणिवपूर्वक हाती घेतल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी दिली.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *