नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या घराच्या गच्चीवर गांजाचे झाड उगवणाऱ्या व्यक्तीला मुख्य न्यायदंडाधिकारी किर्ती जैन देसरडा यांनी 6 जानेवारी 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिलगेट परिसरात पसरणारा गांजा या प्रतिबंधीत अमली पदार्थाचा सुगंध पोहचला. माहिती मिळाल्यानंतर त्या कायद्यातील तरतुदींप्रमाणे राजपत्रित अधिकारी म्हणून पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांना सोबत घेवून तेथे छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणी कुंड्यांमध्ये ज्याप्रमाणे सुगंध देणारी फुले उगवली जातात त्याचप्रमाणे गांजाचे झाड उगवलेले होते. कायद्यातील तरतुदीनुसार त्या ठिकाणी उगवलेल्या गांजाच्या झाडाचे वजन करण्यात आले ते वजन जवळपास 1.5 किलो आहे. कायद्यातील तरतुदीनुसार पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 5/2023 अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या कलम 20(ब) नुसार दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार यांच्याकडे देण्यात आला.
आज संजय निलपत्रेवार आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी आपल्या घराच्या छतावर गांजाची उगवण करणाऱ्या शेख शौकत सलीम शेख अब्दुल हमीद (38) यास मुख्य दंडाधिकारी न्यायालयासमक्ष हजर करून तपासासाठी पोलीस कोठडी मागितली. गांजाचे झाड एकच आहे की, ही गांजा उगवणीची प्राथमिक तपासणी आहे याचा शोध घ्यायचा आहे असे न्यायालयासमक्ष सांगण्यात आले. न्या. किर्ती जैन देसरडा यांनी शेख शौकत सलीम शेख अब्दुल हमीद यास 6 जानेवारी 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
