पोलीस रायजिंग डे दरम्यान दौडचे आयोजन
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस रायजिंग डे निमित्त 2 जानेवारी ते 8 जानेवारी 2023 पर्यंत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यात आज दि.3 जानेवारी रोजी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी एका दौडला सकाळी 7 वाजता रवाना केले.
आज सकाळी 7 ते 8 यावेळेदरम्यान एका दौडचे आयोजन करण्यात आले होते. त्यास पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयातून सुरूवात केली. या दौडमध्ये पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, इतर शाखा प्रभारी अधिकारी, क्युआरटी पथक, आरसीपी पथक, पोलीस मुख्यालय यांच्यासह वेगवेगळ्या महाविद्यालयातील तरुण आणि तरुणींनी सहभाग घेतला. ही दौड पोलीस अधिक्षक कार्यालय ते छत्रपती श्री. शिवाजी महाराज पुतळा, श्री. महात्मा गांधीजी यांचा पुतळा, महाविर चौक, मल्टीपर्पज हायस्कुल, तरोडेकर मार्केट, वजिराबाद चौक अशी परत पोलीस अधिक्षक कार्यालयात संपली.
या प्रसंगी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दौडमध्ये सहभागी झालेल्या तरुण-तरुणींना पोलीस भरतीबद्दल मार्गदर्शन केले. पोलीस भरती पुर्णपणे तुमच्या गुणवत्तेवर होईल. कोणाच्या भुलथापांना बळी पडू नका, कोणी जर तुम्हाला पोलीस भरतीबद्दल गैरसमज करून देत असतील तर माझ्याशी किंवा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तशी माहिती देण्याचे आवाहन केले.
आजच्या दौडसाठी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सुधाकर आडे, भगवान धबडगे, अनिरुध्द काकडे, संजय ननवरे, जगदीश भंडरवार, राखीव पोलीस निरिक्षक विजय धोंडगे,जनसंपर्क अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे यांनी सहभाग घेतला.