नांदेड(प्रतिनिधी)-पोलीसांनी पकडलेले गोवंश गुन्हा दाखल झाला तेंव्हा देवकृपा गोशाळा कर्मयोगी फाऊंडेशन सरसम यांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर ते गोवंश परत ज्याच्याकडून पकडले होते त्यांनाच परत देण्याचे आदेश प्रथमर्ग न्यायदंडाधिकारी हदगाव आणि किनवट न्यायालयाने दिले होते. या विरुध्द गोशाळेने जिल्हा न्यायालयात केलेले अपील मंजुर झाले आहे. हे दोन प्रकरण प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी दिले आहेत.
गुन्हा क्रमांक 22/2019 मध्ये पोलीस ठाणे मनाठा येथे 10 गोवंश जप्त करून ते गोवंश सांभाळण्यासाठी देवकृपा गोशाळा तथा गो विज्ञान केंद्र पवना ता.हिमायतनगर यांच्या ताब्यात देण्यात आले होते. याबाबत हदगाव न्यायालयाने दि.22 मार्च 2019 रोजी निकाल देवून ते गोवंश नानाजी संभाजी नागरे रा.गिरगाव ता.वसमत जि.हिंगोली यांना देण्याचे आदेश दिले. या विरुध्द देवकृपा गोशाळेने किरण सुभाष बिचेवार यांच्यावतीने फौजदारी रिव्हीजन (तपासून सुधारणे) रिव्हजन क्रमांक 41/2019 जिल्हा न्यायालय नांदेड येथे दाखल केला. फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम 397 प्रमाणे हा अर्ज करण्यात आला होता. हदगाव न्यायालयाने निकाल देतांना देवकृपा गोशाळा ही या प्रकरणात एक पक्ष (पार्टी) नाही यावर भर देत ते दहा गोवंश नानाजी नागरे यांना देण्याचे आदेश दिले होते. त्याविरुध्द रिव्हीजन करण्यात आले होते. रिव्हीजनचा निकाल देतांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी याप्रकरणात अर्जदार देवकृपा गोशाळा यांना ऐकण्याचा अधिकार (लोकस स्टॅंडी) नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. पण जिल्हा न्यायालयाने वरिष्ठ न्यायालयाचा निवाडा बालगंगाधर त्रिपाठी या प्रकरणाचा उल्लेख करून देवकृपा गोशाळेने जनावरांचे कल्याण करण्यासाठी ही संस्था स्थापन केल्याचा उल्लेख करून गोशाळेची रिव्हीजन पिटीशन मंजुर केली आहे.
दुसऱ्या एका प्रकरणात ईस्लापूर पोलीसांनी शिवणी येथून कार्यवाही करत 9 गोवंश पकडले होते. त्या संदर्भाने सुध्दा किनवट प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने निकाल देवून ते 9 गोवंश अब्दुल सलीम अलीम शेख यास परत देण्याचे आदेश दिले होते. त्याविरुध्द सुध्दा जिल्हा न्यायालयात देवकृपा गोशाळेच्यावतीने गणेश राजू यशवंतकर यांनी रिव्हीजन पिटीशन क्रमांक 45/2021 दाखल केले. या निकालात सुध्दा जिल्हा न्यायाधीशांनी गोशाळेकडे असलेले 9 गोवंश त्यांच्यात ताब्यात ठेवावेत असे आदेश दिले आहेत.
याप्रकरणाची माहिती देतांना गोशाळेचे संचालक किरण बिचेवार यांनी सांगितले की, आजच्या परिस्थितीत जवळपास 400 गोवंश गोशाळेत आहेत. त्यांच्या संगोपनासाठी गोभक्तांनी मदत करावी. नांदेड जिल्ह्यात विविध न्यायालयांमध्ये 128 प्रकरणे दाखल करण्यात आली होती. मागील 7 वर्षापासून गोवंश सेवेचे कामकाज सुरू आहे. जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकालांमध्ये गोशाळेच्यावतीने ऍड.एस.जे.तोष्णीवाल, ऍड.जे.एस.हाके यांनी काम पाहिले. मुंबईचे ऍड.राजू गुप्ता यांच्या मार्गदर्शनात हे काम चालते. किनवट येथील ऍड.पंकज गावंडे आणि ऍड.अविनाश नरवाडे हे सुध्दा गोवंश प्रकरणांमध्ये बाजू मांडतात.
